HDFC Bank Manager Dies of Cardiac Arrest: एचडीएफसी बँकेच्या ३८ वर्षीय कर्मचाऱ्याचा लॅपटॉपवर काम करत असताना अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. १९ जून रोजी घडलेली ही घटना बँकेतील कॅमेऱ्यात कैद झाली असून ती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. राजेश शिंदे असे या कर्मचाऱ्याचे नाव असून उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यातील बँकेच्या शाखेत ही घटना घडली आहे. शिंदे यांना त्यांच्या सहकाऱ्यांनी सीपीआर दिला. मात्र, तरीही त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर बँकेतील कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
एका मिनिटाच्या व्हायरल व्हिडिओमध्ये शिंदे मृत्यूपूर्वी शेजारी बसलेल्या आपल्या सहकाऱ्याशी संवाद साधताना दिसत आहेत. लॅपटॉपवर काही काम करत असताना सहकाऱ्यांना माहिती नसताना शिंदे अचानक खुर्चीवर झुकले. मात्र, त्याची अवस्था लक्षात येताच कर्मचाऱ्यांनी त्याच्या डेस्कवर धाव घेत त्याला जमिनीवर झोपवले. त्यांनी सीपीआर पद्धतीचा वापर करून त्याला पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्नही केला. मात्र, त्यांचा मृत्यू झाला.
अनेक सोशल मीडिया युजर्सनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या असून, अनेकांनी अशा घटनांमध्ये वाढ झाल्याचे अधोरेखित केले आहे. काही वापरकर्त्यांनी शाळांमध्ये सीपीआर सक्तीचा अभ्यासक्रम करण्यास सांगितले. तर, काहींनी व्यायाम आणि निरोगी आहाराद्वारे निरोगी जीवन राखण्याचा सल्ला दिला.
या महिन्याच्या सुरुवातीला मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या ४७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारत आणि पाकिस्तान यांच्यात १० जून २०२४ रोजी टी-२० विश्वचषकातील साखळी सामना खेळला गेला. या सामन्याला उपस्थित राहिल्यानंतर त्यांना न्यूयॉर्कमध्ये असताना हृदयविकाराच्या झटका आला.
यावर्षी मार्च महिन्यात आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने राज्यसभेत भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या अहवालाचा हवाला दिला. ज्यात असे सांगितले होते की, २०१६ मध्ये भारतातील मृत्युपैकी एकूण २८. १ टक्के लोकांचा मृत्यू हृदयविकारच्या झटक्याने झाला. हे आकडे अंत्यंत चिंताजनक आहेत.