पश्चिम बंगालमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामध्ये एक व्यक्ती भररस्त्यात काठीने एका महिलेला व पुरुषाला मारहाण करत आहे. पोलिसांनी सांगितले की, या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीच्या अटकेसाठी छापेमारी केली जात आहे.
चोपडा ब्लॉकमधील लखीपूर ग्राम पंचायतीच्या दिघलगाव परिसरात एका प्रेमी युगुलाला सालीसी सभा (Kangaroo court) मध्ये बेदम मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ माजली आहे.
पश्चिम बंगालमधील उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील चोपडा येथे अनैतिक संबंधासाठी एका जोडप्याला बेदम मारहाण करण्यात आली. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. भाजप आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षासह राजकीय पक्षांच्या नेत्यांनी हा व्हिडिओ शेअर करत या घटनेचा निषेध केला आहे.
बांबूच्या काठीने दोघांना मारहाण करणाऱ्या व्हिडिओतील व्यक्ती तजेमुल ऊर्फ 'जेसीबी' नावाचा टीएमसीचा स्थानिक नेता असल्याचा दावा भाजपच्या बंगाल शाखेने केला आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना सालिशी सभेत (कांगारू कोर्ट) घडली.
इस्लामपूरचे पोलिस अधीक्षक जॉबी थॉमस के यांनी पीटीआयला सांगितले की, पोलिसांनी सोशल मीडियावर व्हिडिओ क्लिप पाहिली आणि पडताळणीनंतर गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी सांगितले की, गुन्हेगाराला अटक करण्यासाठी आम्ही छापे टाकण्यास सुरुवात केली असून या कृत्यामागील कारणांचा तातडीने तपास करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
वेदनेने तडफडणाऱ्या महिलेला मारहाण करताना हा व्यक्ती व्हिडिओमध्ये दिसत आहे. आरोपीने एका पुरुषालाही काठीने मारहाणही केली.
पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या राजवटीचा हा कुरूप चेहरा आहे. व्हिडिओतील माणूस, जो एका महिलेला बेदम मारहाण करत आहे... ते आपल्या 'इन्साफ' सभेच्या माध्यमातून त्वरित न्याय देण्यासाठी प्रसिद्ध आहेत आणि चोप्राचे आमदार हमीदूर रहमान यांचे निकटवर्तीय आहेत, असे भाजपचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी म्हटले आहे.
पश्चिम बंगालच्या प्रत्येक गावात एक संदेशखली असून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी महिलांसाठी शाप आहेत, असा दावा त्यांनी केला. बंगालमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ममता बॅनर्जी या राक्षसाविरोधात कारवाई करतील की शेख शाहजहानच्या बाजूने उभ्या राहिल्याप्रमाणे त्याचा बचाव करतील? असे मालवीय यांनी म्हटले आहे.
शाहजहान हा उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील संदेशखली येथील तृणमूल काँग्रेसचा अटक करण्यात आलेला पदाधिकारी आहे, जिथे तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांवर लैंगिक शोषण आणि जमीन हडप केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
टीएमसीचे आमदार हमीदुर रहमान यांनी आरोपींशी कोणताही संबंध असल्याचा इन्कार केला असून हा पक्षाचा नसून गावाचा विषय असल्याचे म्हटले आहे. तृणमूल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कनियालाल अग्रवाल यांनी या घटनेचे कारण या जोडप्याचे कथित अनैतिक संबंध असल्याचे म्हटले आहे. पक्ष या प्रकरणाची चौकशी करेल, असे ते म्हणाले.
तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते शंतनू सेन यांनी या घटनेचा निषेध केला असून डाव्या आघाडीच्या काळातही अशा प्रकारची कांगारू न्यायालये सामान्य होती, याकडेही लक्ष वेधले आहे.
संबंधित बातम्या