उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये एका नवख्या ड्रायव्हरने ताशी १०० किमी वेगाने कार चालवून ६ विद्यार्थिनींना धडक दिली. यात सर्व मुली गंभीर जखमी झाल्या असून त्यातील तिघींची प्रकृती गंभीर आहे. रक्ताने माखलेल्या विद्यार्थिनी रस्त्यावर पडलेल्या पाहून एकच खळबळ उडाली. या मुली शिर्डी साई शाळेच्या विद्यार्थिनी आहेत. सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रामगंगा विहार येथे ही घटना घडली.
कार चालकाला पोलिसांच्या ताब्यात घेतलं आहे. जखमींना विवेकानंद रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका विद्यार्थिनीच्या वडिलांनी सांगितले की, आधी या मुलींचा पाठलाग करण्यात आला, त्यानंतर भरधाव कार चालवून त्यांना चिरडले गेले. कारमध्ये पाच तरुण बसले होते, असा दावा त्यांनी केला. कार थांबताच चार तरुण पळून गेले.
रामगंगा विहार येथील गोल्डन गेट आणि आनंदम सिटी हाऊसिंग सोसायटीसह हायस्ट्रीट समोरील रस्त्यावर दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली. बलेनो कारमध्ये पाच तरुण बसले होते. शगुन या तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. लक्ष्य परेजा, दिव्यांशू, उदय, कौशिक आणि यश सिरोही हे तरुण घटनेनंतर पळून गेले.
जखमी विद्यार्थिनीपैकी एकीच्या वडिलांनी सांगितले की, विद्यार्थिनींचा आज शाळेचा शेवटचा दिवस होता. शाळेतून बोर्ड परीक्षेचे ओळखपत्र घेऊन विद्यार्थिनी हाय स्ट्रीटवर पोहोचल्या होत्या. गोल्डन गेट रोडवरील आनंदम सिटीसमोरील रस्त्यावर विद्यार्थिनी फिरत होत्या. दरम्यान, पाच तरुणांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. हे पाहून विद्यार्थिनी तेथून निघून जाऊ लागल्या.
त्याचवेळी या तरुणांनी कारमध्ये बसून सुमारे १०० च्या वेगाने विद्यार्थिनींवर कार चालवली. हा अपघात नसून तरुणांनी जाणीवपूर्वक मुलींना उडवले आहे. हा खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा आहे. सध्या स्थानिक पोलीस या प्रकरणाला अपघात म्हणत आहेत.
एसपी क्राइम सुभाषचंद्र गंगवार यांनी सांगितले की, शगुन नावाच्या तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. तो कार चालवायला शिकत होता. यावेळी त्यांनी विद्यार्थिनींवर कार चालवली आहे. सहापैकी ३ विद्यार्थ्यांची प्रकृती ठीक आहे. त्यातील ३ मुली गंभीर आहेत.
संबंधित बातम्या