बेंगळुरूतील बेकरीत १२ प्रकारच्या केकमध्ये आढळले कॅन्सरला कारणीभूत ठरणारे घटक; सर्वत्र खळबळ
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  बेंगळुरूतील बेकरीत १२ प्रकारच्या केकमध्ये आढळले कॅन्सरला कारणीभूत ठरणारे घटक; सर्वत्र खळबळ

बेंगळुरूतील बेकरीत १२ प्रकारच्या केकमध्ये आढळले कॅन्सरला कारणीभूत ठरणारे घटक; सर्वत्र खळबळ

Oct 04, 2024 01:07 PM IST

FSSAI Warning: बेकरींमधून गोळा केलेल्या केकच्या नमुन्यांमध्ये हानिकारक कृत्रिम रंग आढळले, ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला कर्करोग होऊ शकतो.

केकमध्ये आढळले १२ हानिकारक नमुने
केकमध्ये आढळले १२ हानिकारक नमुने

Food Safety and Standards Authority of India: लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला केक खायला आवडतो. मात्र, या केकमुळे एखाद्याच्या आरोग्यावर किती गंभीर परिणाम होऊ शकतो, याची कल्पना खूप कमी लोकांना असेल. कर्नाटकातील बेकरींमधून गोळा केलेल्या केकच्या नमुन्यांमध्ये हानिकारक कृत्रिम रंग आढळले आहेत, जे हानिकारक आणि कर्करोगास कारणीभूत ठरू शकतात. 

यापूर्वी कर्नाटकमध्ये आरोग्याच्या कारणास्तव कॉटन कँडी आणि गोबी मंचूरियन सारख्या स्ट्रीट फूडमध्ये रोडामाइन-बी सारख्या कृत्रिम खाद्य रंगांच्या वापरावर बंदी घालण्यात आली होती. तेव्हापासून कर्नाटकमध्ये अन्न सुरक्षा नियमांची काटेकोर तपासणी सुरू आहे. एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, ‘आम्ही चाचणी केलेल्या काही केकच्या नमुन्यांमध्ये हानिकारक, कर्करोगास कारणीभूत पदार्थ आढळले. २००६ च्या अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम आणि २०११ पासून संबंधित अन्न सुरक्षा नियमांनुसार अशा पदार्थांवर बंदी घालण्यात आली आहे. बेकरींनी तात्काळ सुरक्षा मानकांचे पालन करावे, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल,’ असा इशारा त्यांनी दिला.

अन्न सुरक्षा आयुक्त श्रीनिवास के यांनी राज्यभरातील बेकरींना त्यांच्या उत्पादनांमध्ये असुरक्षित रसायने आणि पदार्थांचा वापर न करण्याचा इशारा दिला. बंगळुरू येथील बेकरींमधून गोळा केलेल्या केकवर नुकत्याच झालेल्या चाचण्यांमध्ये संभाव्य धोकादायक पदार्थ असल्याचे सिद्ध झाले, असेही त्यांनी म्हटले.

कर्नाटक अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 'आरोग्यासाठी हानिकारक असलेल्या केकमध्ये अल्लुरा रेड, सनसेट यलो एफसीएफ, पोन्सेऊ ४ आर, टार्ट्राझिन आणि कार्मोइसिन सारखे कृत्रिम रंग आढळले, जे सर्व निर्धारित सुरक्षा मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात होते. रेड लव्ह व्हेलव्हेट ब्लॅक फॉरेस्ट यांसारखा केक तयार करण्यासाठी अशा कृत्रिम रंगाचा वापर केला जातो, जे कर्करोग आणि आरोग्याच्या इतर गंभीर जोखमीशी जोडली गेली आहेत. या पदार्थांच्या अतिवापरामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण अलर्ट मोडवर

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने केकची तपासणी करण्याबरोबरच अन्य खाद्यपदार्थांची तपासणी केली.  ऑगस्ट महिन्यात त्यांनी २२१ पनीर नमुने आणि ६५ खोया नमुने तपासले असता प्रत्येकी एक नमुने निकृष्ट दर्जाचे असल्याचे निदर्शनास आले. त्याचप्रमाणे सप्टेंबर महिन्यात रेल्वेच्या खाद्यपदार्थांचे स्टॉल आणि पर्यटनस्थळांवर केलेल्या तपासणीत अन्न सुरक्षा नियमांचे पालन न केल्याची अनेक प्रकरणे उघडकीस आली.

Whats_app_banner
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर