Canada PM Justin Trudeau Resignation: कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यासोबतच त्यांनी लिबरल पक्षाच्या नेतेपदाचाही राजीनामा दिला आहे. आता त्यांचा नऊ वर्षांचा कार्यकाळ संपला आहे. ट्रुडो यांच्याविरोधात पक्षात असंतोष वाढत असताना ट्रुडो यांनी हे पाऊल उचलले आहे. त्यांनी आज ओटावा येथील रिडेऊ कॉटेज येथील आपल्या निवासस्थानाबाहेर पत्रकार परिषद घेऊन आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. मात्र, जोपर्यंत पक्षाचा नवा नेता निवडला जात नाही तोपर्यंत ते या पदावर कायम राहतील.
कॅनडामध्ये या वर्षी संसदीय निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वी त्यांच्या पक्षात नेतृत्व बदलाची मागणी होत होती. त्यांच्या राजीनाम्यानंतर नियोजित वेळेपूर्वी निवडणुका घेण्याची मागणी होऊ शकते, असे मानले जात आहे. ट्रुडो यांच्यावर आपल्याच पक्षाचे खासदार पंतप्रधान पदावरून पायउतार होण्यासाठी अनेक महिन्यांपासून दबाव बनवत होते.
गेल्या महिन्यात उपपंतप्रधान आणि अर्थमंत्री क्रिस्टिया फ्रीलँड यांनी ट्रुडो सरकारवर गंभीर आरोप करत राजीनामा दिला होता. तेव्हापासून त्यांना सातत्याने टार्गेट केले जात होते आणि दबाव इतका वाढला की शेवटी त्यांना पद सोडावे लागले. त्यांच्याप्रमाणेच त्यांचे वडील पियरे ट्रुडो यांनाही निवडणुकीपूर्वी पंतप्रधानपद सोडावे लागले होते. जस्टिन ट्रुडो हे कॅनडाचे पंतप्रधान आहेत ज्यांनी भारताविरोधात गरळ ओकली होती. गेल्या दीड वर्षांपासून भारतविरोधी अजेंडा राबवून आपल्या सरकारविरोधातील सत्ताविरोधी लाट शांत करायची होती, पण त्याचा काहीच परिणाम झाला नाही.
ट्रुडो २०१५ पासून कॅनडाचे पंतप्रधान आहेत. कन्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या १० वर्षांच्या राजवटीनंतर ते सत्तेवर आले आणि त्यांच्या कार्यकाळाच्या सुरुवातीलाच देशाला उदारमतवादी भूतकाळात आणल्याबद्दल त्यांचे कौतुक झाले. अन्न आणि घरांच्या वाढत्या किंमती आणि वाढते स्थलांतर यासह अनेक मुद्द्यांवर ट्रुडो सरकारवर जनता नाराज होती.
जस्टिन ट्रूडो यांनी देशाला उद्देश केलेल्या भाषणात म्हटले की, येत्या निवडणुकीत देशाला पात्र नेता मिळेल. मला पक्षांतर्गत लढाई लढावी लागणार असेल, तर त्या निवडणुकीत मी सर्वोत्तम निवड होऊ शकत नाही. नवीन पंतप्रधान आणि लिबरल पक्षाचे इतर नेते पक्षाची मूल्ये पुढे नेतील.
जस्टिन ट्रुडो मागील ११ वर्षांपासून लिबरल पक्षाचे नेते असून ९ वर्षांपासून पंतप्रधान आहेत. पण, गेल्या काही काळापासून त्यांना जगभरातून टीकेचा सामना करावा लागला आहे. खलिस्तानी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येनंतर ट्रुडोंनीभारतावर आरोप केल्याने दोन्ही देशांचे द्विपक्षीय संबंध बिघडले होते. आता कॅनडाचा नवा पंतप्रधान कोण होणार, हे भारतासाठीही महत्वपूर्ण आहे.
संबंधित बातम्या