टोरंटो विमानतळावर झालेल्या भीषण विमान अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये दिसणारा सीन एखाद्या हॉलिवूड चित्रपटातील दृश्यापेक्षा भयंकर दिसत आहे. बर्फाळ धावपट्टीवर उतरताना डेल्टा एअर लाइन्सचे विमान उलटले आणि कोसळले. या दुर्घटनेत १८ प्रवासी जखमी झाले असले तरी कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अमेरिकेतील मिनियापोलिस येथून एंडेव्हर एअरचे सीआरजे-९०० हे विमान टोरंटो विमानतळावर उतरण्याच्या प्रयत्नात असताना सोमवारी ही घटना घडली. यावेळी विमानाचा अचानक तोल गेला आणि धावपट्टीवर उलटले. क्रॅश लँडिंगनंतर विमानातून काळा धूर निघू लागतो आणि प्रवासी स्वत:ला वाचवण्यासाठी धावत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. काही फोटोंमध्ये प्रवासी बर्फाळ वारा आणि जोरदार बर्फवृष्टीमध्ये तोंड झाकून निघताना दिसत आहेत.
अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी विमानावर पाणी टाकून आग विझवण्यास सुरुवात केली. टोरंटो विमानतळ प्राधिकरणाच्या प्रमुख डेबोरा फ्लिंट यांनी सांगितले की, बचाव पथक काही मिनिटांतच पोहोचले आणि त्यांनी सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. एका चिमुकल्यासह सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे विमानतळाने दोन तास सर्व उड्डाणे थांबवली होती, मात्र आता कामकाज पुन्हा सुरू करण्यात आले आहे.
डेल्टा एअर लाइन्सने एका निवेदनात म्हटले आहे की ते प्रभावित प्रवाशांच्या काळजीवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करीत आहेत. कंपनीने प्रवाशांच्या कुटुंबियांसाठी हेल्पलाइनही जारी केली आहे. डेल्टाचे सीईओ एड बॅस्टियन यांनीही या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले असून सर्व बचाव कर्मचारी आणि बचाव पथकांचे आभार मानले आहेत.
अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी रविवारी टोरंटोमध्ये झालेल्या हिमवादळाचा परिणाम अजूनही दिसून येत आहे. जोरदार वारे आणि कडाक्याच्या थंडीत सोमवारी विमानतळावर मोठ्या संख्येने उड्डाणे सुरू होती.
संबंधित बातम्या