khalistani separatists threat To Hindus in Canada : कॅनडातील हिंदूंना खलिस्तानी दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं आहे. काही दिवसांपूर्वी हिंदूवर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. ही घटना ताजी असतांना आता आणखी एका हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे. खलिस्तानी दहशतवाद्यांच्या धमक्यांमुळे कॅनडातील हिंदू मंदिरातील कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. हा कार्यक्रम भारतीय दूतावासातर्फे आयोजित करण्यात येणार होता. ब्रॅम्प्टन त्रिवेणी कम्युनिटी सेंटर येथे होणाऱ्या या कार्यक्रमात हिंदू आणि शिखांना हयातीचा दाखला देण्यात येणार होता. हा कार्यक्रम १७ नोव्हेंबरला होणार होता, पण त्याआधीच खलिस्तानी दहशतवाद्यांच्या भीतीमुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.
ब्रॅम्प्टन त्रिवेणी कम्युनिटी सेंटरने जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की, ब्रॅम्पटन त्रिवेणी मंदिरातील जीवन प्रमाणपत्र कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. या कार्यक्रमात अत्यंत धोकादायक पातळीवर हिंसक आंदोलन होणार असल्याची माहिती पील प्रादेशिक पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे १६-१७ नोव्हेंबरला ग्रेटर टोरंटो परिसरात मोठा गदारोळ होण्याची शक्यता देखील पोलिसांनी आहे.
त्रिवेणी कम्युनिटी सेंटरने पील पोलिसांना मंदिराला मिळालेल्या धमक्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच कॅनडात राहणारे हिंदू आणि सर्वसामान्य लोकांचे रक्षण करण्यात यावे तसेच या कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या सर्व समाजबांधवांची आम्ही माफी आम्ही मागत असून कॅनेडियन नागरिकांना आता इथल्या हिंदू मंदिरात जाणं असुरक्षित वाटू लागलं आहे, याचं आम्हाला खूप दु:ख आहे. ब्रॅम्प्टन त्रिवेणी मंदिर आणि कम्युनिटी सेंटर हे हिंदू आणि समविचारी व्यक्तींचे आध्यात्मिक केंद्र आहे. पूजा, कीर्तन, सेवा आणि प्रवचन इत्यादी कार्यक्रम नियमित या ठिकाणी होत असतात.
दरम्यान, कॅनडाच्या पील रिजनल पोलीस प्रमुख नीशान दुरियाप्पा यांनी ब्रॅम्प्टन त्रिवेणी मंदिर आणि कम्युनिटी सेंटरला पत्र लिहिले आहे. रद्द करण्यात आलेले कॉन्सुलर कॅम्प १७ नोव्हेंबररोजी पुन्हा आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आम्हाला विश्वास आहे की कार्यक्रमाची तात्पुरती स्थगिती सध्याचा तणाव कमी करण्यास फायदेशीर ठरेल. आम्ही या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांच्या कल्याणासाठी आणि रक्षणासाठी काटिबद्द आहोत.
याआधी ३ नोव्हेंबर रोजी खलिस्तानी समर्थकांनी टोरंटोजवळील ब्रॅम्प्टन येथील हिंदू सभा मंदिरातील वाणिज्य दूतावासाच्या कॅम्पवर हिंसक हल्ला केला होता. कॅनडा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर या हल्ल्याचा मोठ्या प्रमाणात निषेध करण्यात आला. या व्हिडिओमध्ये मंदिराच्या सभोवतालच्या मैदानात काही खालिस्तानी हिंदू नागरिकांना मारहाण करत होते. दरम्यान, पोलिसांनी मारहाण करणाऱ्यांना ताब्यात घेतलं. शनिवारी जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, कॅनडाने भारत विरोधी भूमिका घेतल्याने देशात तणाव वाढला आहे.
कॅनडातील हिंदू मंदिरावर झालेल्या हल्ल्याचा पंतप्रधान मोदींनी निषेध केला आहे. हा हल्ला भ्याड असून अशा घटना भविष्यात स्वीकारल्या जाणार नाही, असे मोदी म्हणाले. त्यांनी कॅनडाच्या अधिकाऱ्यांना या प्रकरणात त्वरीत कारवाई करून लोकांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली. कॅनडातील हिंदू मंदिरावर जाणीवपूर्वक झालेल्या हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. आपल्या राजनय अधिकाऱ्यांना घाबरवण्याचा प्रयत्न देखील निषेधार्थ आहे. अशा प्रकारच्या हिंसाचारामुळे भारताचा निर्धार कधीच कमकुवत होणार नाही. कॅनडा सरकारने न्याय मिळवून द्यावा आणि कायद्याचे राज्य अबाधित ठेवावे, अशी आमची अपेक्षा आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनीही या घटनेचा निषेध केला आहे. कॅनडामध्ये राहणाऱ्या सर्व लोकांना आपला धर्म पाळण्याचा आणि सुरक्षित राहण्याचा अधिकार असल्याचे ट्रुडो म्हणाले.
कॅनडातील एका हिंदू मंदिरात झालेल्या हिंसक आंदोलनादरम्यान काही खालिस्तान वाद्यांनी सशस्त्र हल्ला केल्याच्या आरोपाखाली कॅनडापोलिसांनी ३५ वर्षीय ब्रॅम्प्टन व्यक्तीला अटक केली आहे. टोरंटो स्टारने दिलेल्या वृत्तानुसार, इंद्रजीत गोसाळ असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. गोसाल हा कॅनडातील शीख फॉर जस्टिस संघटनेचा समन्वयक आहे. या संघटनेवर भारतात बंदी आहे. आंदोलनादरम्यान घडलेल्या घटनांचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. हिंदू नागरिकांवर झेंडे आणि काठ्यांनी हल्ले केले जात असल्याचे कॅनडातील अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहे.