
सासूकडून होणारा सुनेचा छळ तुम्ही अनेकदा ऐकला आणि पाहिला असेल. पण अलीकडेच अलाहाबाद उच्च न्यायालयात एक खटला दाखल करण्यात आला ज्यात एका सासूने आपल्या सुनेविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार केली आहे. या प्रकरणी सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान असा ही प्रश्न उपस्थित झाला की, सासू आपल्या सुनेवर असा गुन्हा दाखल करू शकते का? त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने उत्तर दिलं आहे.
घरगुती हिंसाचार कायदा, २००५ अन्वये सासू आपल्या सुनेविरोधात तक्रार दाखल करू शकते, असे उच्च न्यायालयाने एका महत्त्वपूर्ण निर्णयात म्हटले आहे. न्यायमूर्ती आलोक माथुर यांनी हा निकाल दिला आणि लखनौच्या कनिष्ठ न्यायालयाने सून आणि तिच्या कुटुंबीयांविरोधात बजावलेले समन्स कायम ठेवले.
'स्मृती गरिमा आणि इतर विरुद्ध उत्तर प्रदेश सरकार' या नावाने हा खटला दाखल करण्यात आला होता, ज्यात सून आणि तिच्या कुटुंबीयांनी कनिष्ठ न्यायालयाने बजावलेल्या समन्सला आव्हान दिले होते.
अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, कायद्याच्या कलम १२ अन्वये कौटुंबिक संबंधात सामायिक घरात राहणारी आणि पीडित असलेली कोणतीही महिला याचिका दाखल करू शकते. जर सासूचा तिच्या सून किंवा कुटुंबातील इतर कोणत्याही सदस्याने मानसिक किंवा शारीरिक छळ केला असेल तर ती देखील पीडित महिलेच्या व्याख्येत येईल आणि तिला कायद्याच्या कलम १२ अन्वये याचिका दाखल करण्याचा अधिकार आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. "
मूळ तक्रारीत सासूने आरोप केला होता की, सून आपल्या पतीवर (तक्रारदाराचा मुलगा) आई-वडिलांच्या घरी राहण्यासाठी दबाव टाकत होती. याशिवाय सासू-सासऱ्यांशी गैरवर्तन करून खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिल्याचा आरोपही सुनेवर करण्यात आला होता. त्याचबरोबर सुनेने दाखल केलेल्या हुंड्यासाठी छळ आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या खटल्याला प्रत्युत्तर म्हणून सूडाच्या भावनेतून ही तक्रार करण्यात आल्याचा युक्तिवाद सुनेच्या वकिलांनी कोर्टात केला.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने म्हटले की, सासूने दाखल केलेली तक्रार प्रथमदर्शनी कौटुंबिक हिंसाचार कायद्याच्या कलम १२ अन्वये गुन्हा ठरते आणि त्यामुळे कनिष्ठ न्यायालयाने बजावलेले समन्स वैध आहे. कलम २ (एफ), २ (एस) आणि कलम १२ एकत्रितपणे वाचल्यास हे स्पष्ट होते की प्रतिवादीसोबत घरगुती संबंधात सामायिक कुटुंबात राहणारी कोणतीही महिला पीडित महिला मानली जाईल.
संबंधित बातम्या
