मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  CAA Laws : लोकसभा निवडणुकीपूर्वी CAA लागू होणार? अधिकाऱ्याने दिली माहिती

CAA Laws : लोकसभा निवडणुकीपूर्वी CAA लागू होणार? अधिकाऱ्याने दिली माहिती

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 02, 2024 11:48 PM IST

CAA Law : लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी सरकारCAA२०१९चे नियम अधिसूचित करणार असल्याची माहिती सरकारी अधिकाऱ्याने दिली आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या आधी केंद्र सरकार नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी सरकार CAA २०१९ चे नियम अधिसूचित करणार असल्याची माहिती पीटीआय वृत्तसंस्थेने सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिली आहे. 

सीएए अंतर्गत बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील छळाला कंटाळून भारतात आलेल्या सहा धर्माच्या (हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चन) लोकांना भारतीय नागरिकत्व दिले जाणार आहे.

सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, सरकार लवकरच सीएएचे नियम जारी करणार आहे. नियम जारी झाल्यानंतर, कायद्याची अंमलबजावणी केली जाऊ शकते आणि पात्र लोकांना भारतीय नागरिकत्व दिले जाऊ शकते. कायद्याला चार वर्षांहून अधिक काळ विलंब झाला असून कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी नियम आवश्यक आहेत. कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी नियम तयार करणे आवश्यक आहे. यासाठी ऑनलाइन पोर्टलही तयार असून संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी २७ डिसेंबर रोजी एका जाहीर सभेत म्हटले होते की CAA ची अंमलबजावणी कोणीही रोखू शकत नाही. हा देशाचा कायदा आहे. 

काय आहे CAA कायदा?
नागरिकत्व सुधारणा कायदा २०१९ द्वारे अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानमधील हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन या सहा धर्माच्या स्थलांतरितांसाठी नागरिकत्वाचे नियम सोपे केले आहेत. या धर्मातील लोक केवळ सहा वर्षे भारतात राहिल्यास त्यांना भारतीय नागरिकत्व प्राप्त होऊ शकते. यासाठी सध्या किमान ११ वर्षे येथे राहणे अनिवार्य आहे. सीएएच्या विरोधात देशभर मोठे आंदोलन झाले असून याच्या निषेधार्थ झालेल्या आंदोलनात किंवा पोलिसांच्या कारवाईत १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. 

WhatsApp channel

विभाग