bypoll results : विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये भाजपप्रणित एनडीएला दणका; 'इंडिया' आघाडीची जोरदार मुसंडी
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  bypoll results : विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये भाजपप्रणित एनडीएला दणका; 'इंडिया' आघाडीची जोरदार मुसंडी

bypoll results : विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये भाजपप्रणित एनडीएला दणका; 'इंडिया' आघाडीची जोरदार मुसंडी

Jul 13, 2024 04:57 PM IST

Bypoll results : देशातील सात राज्यांतील १३ विधानसभा जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीनं भाजपसह एनडीएला धक्का दिला आहे.

विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये भाजपप्रणित एनडीएला दणका; 'इंडिया' आघाडीची जोरदार मुसंडी
विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये भाजपप्रणित एनडीएला दणका; 'इंडिया' आघाडीची जोरदार मुसंडी

Assembly Bypoll Results : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमतापासून रोखणाऱ्या इंडिया आघाडीनं सत्ताधारी एनडीएला पुन्हा एकदा जोरदार दणका दिला आहे. देशातील ७ राज्यांमध्ये १३ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीनं जोरदार मुसंडी मारली आहे. १३ पैकी सात जागांवर इंडिया आघाडीनं विजय मिळवला असून तीन जागांवर आघाडी घेतली आहे. भाजपला फक्त दोन जागा जिंकता आल्या आहेत. एका जागेवर अपक्षानं बाजी मारली आहे.

हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, बिहार, पंजाब आणि तामिळनाडू या राज्यांत ही पोटनिवडणूक झाली होती. यापैकी १० जागांचे निकाल आतापर्यंत हाती आले आहेत. त्यात इंडिया आघाडीची सरशी झाली आहे.

हिमाचल प्रदेशातील तीनही जागांपैकी काँग्रेसनं दोन तर भाजपनं एका जागी विजय मिळवला आहे. उत्तराखंडमधील दोन्ही जागा काँग्रेसनं जिंकल्या आहेत. बिहारच्या रुपौली मतदारसंघात अपक्ष उमेदवार शंकर सिंह यांनी सत्ताधारी जेडीयूच्या कलाधर मंडल यांचा पराभव केला. मध्य प्रदेशातील अमरवाडा मतदारसंघातून भाजपचे कमलेश शाह विजयी झाले आहेत. पंजाबच्या जालंधर पश्चिम मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे मोहिंदर भगत यांनी विजय मिळवला आहे. लोकसभा निवडणुकीत फारशी समाधानकारक कामगिरी करू न शकलेल्या ‘आप’साठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.

पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींचं वर्चस्व कायम

पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या चार जागांसाठी पोटनिवडणूक झाली होती. या चार जागांपैकी चारही जागा तृणमूल काँग्रेसनं जिंकल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या आक्रमक प्रचाराला थोपवणाऱ्या ममता बॅनर्जी यांची जादू राज्यात कायम आहे हेच पोटनिवडणुकीच्या निकालातून दिसून आलं आहे.

तामिळनाडूतील विक्रवंडी विधानसभा मतदारसंघात निवडणूक झाली होती. इथंही सत्ताधारी द्रमुकनं बाजी मारली आहे. द्रमूकचे अन्नियूर शिवा हे विजयी झाले आहेत.

राज्यनिहाय विजयी उमेदवार

पश्चिम बंगाल

कृष्णा कल्याणी, रायगंज (तृणमूल काँग्रेस)

मुकुट मणि अधिकारी, राणाघाट दक्षिण (तृणमूल काँग्रेस)

मधुपर्णा ठाकूर, बागडा, (तृणमूल काँग्रेस)

सुप्त पांडे, माणिकतला, (तृणमूल काँग्रेस)

हिमाचल प्रदेश

कमलेश ठाकूर, देहरा, (काँग्रेस)

आशिष शर्मा, हमीरपूर, (भाजप)

हरदीपसिंग बावा, नालागढ, (काँग्रेस)

उत्तराखंड

काझी मोहम्मद निजामुद्दीन, मंगलौर, (काँग्रेस)

लखापतसिंग बुटोला, बद्रीनाथ, (काँग्रेस)

पंजाब

मोहिंदर भगत, जालंधर पश्चिम, (आप)

तामिळनाडू

अन्नियूर शिवा, विक्रवंडी, (डीएमके)

मध्य प्रदेश

कमलेश शहा, अमरवाडा, (भाजप)

बिहार

शंकर सिंह, रापौली, (अपक्ष)

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर