मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Interim Budget : अंतरिम बजेट म्हणजे काय? पूर्ण अर्थसंकल्पापेक्षा ते वेगळं कसं? समजून घ्या

Interim Budget : अंतरिम बजेट म्हणजे काय? पूर्ण अर्थसंकल्पापेक्षा ते वेगळं कसं? समजून घ्या

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Feb 01, 2024 10:24 AM IST

What is Interim Budget: अंतरिम बजेट म्हणजे काय? हे सोप्या भाषेत जाणून घेऊयात.

Nirmala Sitharaman
Nirmala Sitharaman

Nirmala Sitharaman: देशाची अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी निर्मला सीतारामन या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून काही महिन्यांचे उत्पन्न आणि खर्चाची माहिती देणार आहेत. याशिवाय, या अर्थसंकल्पात काही योजनांबाबतही महत्त्वाची घोषणा केली जाऊ शकते. दरवर्षी सरकार अर्थसंकल्प सादर करते, मग हा अंतरिम अर्थसंकल्प कोणता? तो पूर्ण अर्थसंकल्पापेक्षा वेगळा कसा? हे सोप्या भाषेत जाणून घेऊयात.

आगामी निवडणुकीच्या काळात सरकार अंतरिम अर्थसंकल्प सादर करते. निवडणुकीनंतर येणाऱ्या नव्या सरकारलाच संपूर्ण आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्याचा अधिकार आहे. अंतरिम अर्थसंकल्पात नवे सरकार स्थापन होईपर्यंत खर्चाला परवानगी असते. त्यानंतर अर्थसंकल्प मंजूर केला जातो. या अर्थसंकल्पात नवीन सरकारचा अर्थसंकल्प येईपर्यंत खर्च आणि उत्पन्नाचा तपशील देण्यात येतो. नवीन अर्थसंकल्प येईपर्यंत ही तात्पुरती तरतूद आहे. या कारणास्तव त्याला अंतरिम अर्थसंकल्प असे म्हटले जाते. दरम्यान, २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी माजी अर्थमंत्री अरुण जेटली अर्थसंकल्प सादर करू शकले नाहीत. अरुण जेटली यांची प्रकृती ढासळल्याने त्यांच्या जागी पीयूष गोयल यांनी अर्थसंकल्प सादर केला होता.

अंतरिम अर्थसंकल्पात सरकारचा खर्च, महसूल, वित्तीय तूट, आर्थिक कामगिरी आणि पुढील काही महिन्यांचे अंदाज जाहीर केले जातात. तर, संपूर्ण अर्थसंकल्पात केवळ संपूर्ण आर्थिक वर्षाचा लेखाजोखा मांडला जातो. निवडणुकीच्या काळात पूर्ण अर्थसंकल्प येत नाही. निवडणुका संपल्यानंतर नवीन सरकार अर्थसंकल्प आणते. विशेष म्हणजे, अर्थमंत्री निर्मला सीतारामन सहाव्यांदा लोकसभेचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पाबाबत सरकारकडून अधिक माहिती देण्यात आली नाही. परंतु, पीएम किसान योजना, सन्मान निधी आणि आयुष्यमान भारत सारख्या योजनांचे बजेट वाढवले जाण्याची शक्यता आहे.

WhatsApp channel