buddhadeb bhattacharya : डाव्या चळवळीचा नेता हरपला! बंगालचे माजी मुख्यमंत्री कॉम्रेड बुद्धदेव भट्टाचार्य यांचं निधन-buddhadeb bhattacharya passed away he was former bengal cm west bengal news ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  buddhadeb bhattacharya : डाव्या चळवळीचा नेता हरपला! बंगालचे माजी मुख्यमंत्री कॉम्रेड बुद्धदेव भट्टाचार्य यांचं निधन

buddhadeb bhattacharya : डाव्या चळवळीचा नेता हरपला! बंगालचे माजी मुख्यमंत्री कॉम्रेड बुद्धदेव भट्टाचार्य यांचं निधन

Aug 08, 2024 11:53 AM IST

buddhadeb bhattacharya passed away : पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचं दीर्घ आजाराने निधन झाले आहे. ते ८० वर्षांचे होते. ते काही दिवसांपासून आजारी होते.

डाव्या चळवळीचा नेता हरपला! बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचं निधन
डाव्या चळवळीचा नेता हरपला! बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचं निधन

buddhadeb bhattacharya passed away : पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचं वयाच्या ८० व्या वर्षी निधन आज निधन झालं. बुद्धदेव भट्टाचार्य यांनी बंगालवर दीर्घकाळ राज्य केलं. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांचा मुलगा सुचेतन भट्टाचार्य यांनी त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. बुद्धदेव भट्टाचार्य यांचे बल्लीगंज, कोलकाता येथील त्यांच्या पाम अव्हेन्यू निवासस्थानी आज सकाळी निधन झाले. आजारपणामुळे ते अनेक वर्षे सक्रिय राजकारणापासून दूर होते. कम्युनिस्ट पक्षाचे ते मोठे नेते होते.

डाव्या चळवळीचा मोठा नेता हरपला

बुद्धदेव भट्टाचार्य यांनी २००० ते २०११ पर्यंत बंगालचे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती. त्यांच्या आधी ज्योती बसू २३ वर्षे बंगालचे मुख्यमंत्री होते. अशाप्रकारे बुद्धदेव भट्टाचार्य यांनी डाव्या विचारसरणीच्या कम्युनिस्ट पक्षाची ३४ वर्षांच्या राजवटीत महत्त्वाची भूमिका बजावली. बुद्धदेव भट्टाचार्य हे डाव्या विचारसरणीचे नेते असूनही राज्याच्या प्रगतीसाठी त्यांनी घेतलेली उदारमतवादी धोरणे सर्वश्रुत होती. सामान्यतः डावे पक्ष आर्थिक उदारीकरणाच्या विरोधात असतात. परंतु बुद्धदेव भट्टाचार्य यांनी औद्योगिकीकरणासाठी प्रयत्न केले होते. मात्र, सिंगूरमध्ये भूसंपादनाबाबत मोठा वाद निर्माण झाला होता. सिंगूर प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध केल्याने जनमत डाव्या सरकारच्या विरोधात गेले आणि त्यानंतर बंगालवरील ३४ डाव्यांची राजवट संपुष्टात आली. भारतातात बंगालमध्ये कम्युनिस्ट पक्ष हा सर्वाधिक काळ सत्तेत होता.

राजकारणात येण्यापूर्वी बुद्धदेव भट्टाचार्य होते शिक्षक

५ दशकांच्या राजकीय कारकिर्दीत बुद्धदेव भट्टाचार्य यांचे कम्युनिस्ट पक्षावर मोठे वर्चस्व होते. त्यांचा जन्म १ मार्च १९४४ रोजी उत्तर कोलकाता येथील एका ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे आजोबा कृष्णचंद्र स्मृतीतीर्थ हे सध्याच्या बांगलादेशातील मदारीपूर येथून आले होते. ते एक महान संस्कृत विद्वान आणि लेखक होते. याशिवाय ते पुरोहितही होते. त्यांना पुरोहित दर्पण म्हणत. तथापि, बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या वडिलांनी पुजारी न होण्याचा निर्णय घेतला आणि स्वतःचा प्रकाशन व्यवसाय सुरू केला. राजकारणात येण्यापूर्वी बुद्धदेव भट्टाचार्य हे शिक्षक होते. बुद्धदेव भट्टाचार्य यांच्यानंतर तृणमूल कॉँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी या बंगालच्या मुख्यमंत्री झाल्या.

विभाग