मायावती राजकारणातून निवृत्त होणार? स्वतः पुढे येऊन केला खुलासा-bsp chief mayawati retirement from politics rumors ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  मायावती राजकारणातून निवृत्त होणार? स्वतः पुढे येऊन केला खुलासा

मायावती राजकारणातून निवृत्त होणार? स्वतः पुढे येऊन केला खुलासा

Aug 26, 2024 06:52 PM IST

बहुजन समाज पक्षाच्या नेत्या, उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती या सक्रिय राजकारणातून निवृत्त होत असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं असताना खुद्द मायावती यांनी पुढे येऊन मीडियासमोर आपलं स्पष्टीकरण दिलं आहे.

बसप प्रमुख मायावती राजकारणातून निवृत्त होण्याची चर्चा
बसप प्रमुख मायावती राजकारणातून निवृत्त होण्याची चर्चा (Naeem Ansari)

बहुजन समाज पक्षाच्या नेत्या, उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती या सक्रिय राजकारणातून निवृत्त होत असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं असताना खुद्द मायावती यांनी पुढे येऊन मीडियासमोर आपलं स्पष्टीकरण दिलं आहे. मायावती यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या चर्चांना उत्तर दिलं आहे. राजकारणातून निवृत्त होण्याच्या चर्चा या विरोधकांनी पसरवल्या असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मायावती या चार वेळा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री होत्या.

मायावती यांनी त्यांच्या सोशल मीडिया X हँडलवर लिहितात, ‘डॉ. भीमराव आंबेडकर आणि आदरणीय कांशीरामजी यांच्यासारख्या बहुजनांच्या आंबेडकरी जनप्रवाहाला कमकुवत करण्याचे विरोधकांचे कारस्थान हाणून पाडण्यासाठी बसप सारख्या स्वाभिमान राजकीय चळवळीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहण्याचा माझा निर्धार आहे. सक्रिय राजकारणातून निवृत्त होण्याचा प्रश्नच उदभवत नाही. या बातमीत अजिबातच तथ्य नाही. माझ्या गैरहजेरीत किंवा प्रकृती अस्वास्थ्यामुळे पक्षाने आकाश आनंद यांना बसपचा उत्तराधिकारी म्हणून पुढे केले, तेव्हापासून जातीयवादी माध्यमे अशा प्रकारच्या खोट्या बातम्या पसरवत आहेत. माझ्याबद्दल अशा खोट्या बातम्या पसरवणे हा जातीयवादी मीडियाचा जुनाच डाव आहे. यापासून लोकांनी सावध रहावे. याआधीसुद्धा मला राष्ट्रपती बनवण्याच्या अफवा पसरल्या होत्या. आदरणीय श्री कांशीरामजींनी अशीच ऑफर पूर्वी नाकारली होती. राष्ट्रपती होणे म्हणजे सक्रिय राजकारणातून निवृत्त होणे असते. जे पक्षाच्या हितासाठी त्यांना मान्य नव्हते. त्यामुळे त्यांची शिष्या हा प्रस्ताव कसे स्वीकारणार?’ असा सवाल मायावती यांनी केला आहे.

मायावतींच्या निवृत्तीच्या चर्चांना का आलं उधाण?

मायावती यांनी त्यांचा पुतण्या आकाश आनंद याला १० डिसेंबर २०२३ रोजी बसप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आपला उत्तराधिकारी म्हणून घोषित केलं होतं. आकाश आनंदवर उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड राज्याची जबाबदारी देण्यात आली होती. दरम्यान, उद्या, २७ ऑगस्ट रोजी बसपची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होत आहे. या बैठकीत आगामी चार राज्यातील विधानसभा निवडणुकांची जबाबदारी आकाश आनंद यांच्याकडे देण्याची मायावती यांनी तयारी चालवली असल्याचं बोललं जातं. याची अधिकृत घोषणा राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये करण्यात येण्याची शक्यता आहे. या बैठकीत महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये कुणासोबत आघाडी करायची याबाबतही चर्चा होणार आहे. उत्तर प्रदेशात २०२७ साली विधानसभा निवडणुका होणार असून त्या दृष्टिने बैठकीत चर्चा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.