सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने भारतात सॅटेलाइट टू डिव्हाइस सेवा (Satellite-to-Device) सुरू केली आहे. अशी सेवा सुरू करणारी बीएसएनएल ही पहिली टेलिकॉम कंपनी ठरली आहे. आता अखेर बीएसएनएलने युजर्ससाठी ही सेवा लाँच केली आहे. बीएसएनएल डीटूडीने (BSNL D2D) या तंत्रज्ञानासाठी कॅलिफोर्निया येथील कंपनी वियासॅटसोबत भागीदारी केली आहे. ही नवी सेवा सुरू झाल्याची माहिती दूरसंचार विभागाने एक्सवर पोस्ट करत दिली आहे. सॅटेलाईट कनेक्टिव्हिटी हे काही नवीन तंत्रज्ञान नाही. जाणून घेऊया त्यासंबंधीचे सर्व तपशील.
बीएसएनएलची ही विशेष सेवा दुर्गम भागात आणि नेटवर्क नसलेल्या ठिकाणी नेटवर्क पुरवणार आहे. विशेषत: डोंगराळ आणि जंगली भागात या सेवेचा वापर केला जाणार आहे. ही सेवा सुरू करताना दूरसंचार विभागाने एक छोटा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात सॅटेलाईट-टू-डिव्हाइस सेवेची झलक दाखवण्यात आली आहे.
सेल्युलर नेटवर्क किंवा वाय-फाय कनेक्टिव्हिटी उपलब्ध नसलेल्या परिस्थितीत ही सेवा बीएसएनएल वापरकर्त्यांना मदत करेल. कॉलिंगसोबतच युजर्स या सेवेच्या माध्यमातून एसओएस म्हणजेच इमर्जन्सी मेसेजही पाठवू शकतात आणि यूपीआय पेमेंट ही करू शकतात. हे फीचर नॉर्मल कॉल आणि एसएमएससाठी उपलब्ध असेल की नाही हे कंपनीने स्पष्ट केलेले नाही. अॅपल कंपनीने हे फीचर सर्वप्रथम आयफोन १४ सीरिजसोबत बाजारात आणले होते. पण भारतात ही सेवा उपलब्ध नाही.