Bryan Johnson Nikhil Kamath : अँटी-एजिंग इन्फ्लुएन्सर म्हणून प्रख्यात असलेला अमेरिकी कोट्यधीश ब्रायन जॉन्सन यानं झिरोधाचे सह-संस्थापक निखिल कामत यांच्या सोबतची मुलाखत अर्ध्यातच सोडल्याचं समोर आलं आहे. ब्रायननं 'एक्स'वर पोस्ट लिहून असं करण्यामागचं कारणही सांगितलं आहे. त्यानं भारतातील हवेच्या गुणवत्तेला दोष दिला आहे. त्याच्या या उत्तरानंतर उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
निखिल कामत हे ‘डब्ल्यूटीएफ इज ‘ नावानं पॉडकास्ट करतात. या पॉडकास्टमध्ये विविध क्षेत्रांतील मान्यवर हजेरी लावतात. दीर्घायुष्य विषयावरील एका ताज्या भागात कामत यांनी अमेरिकेचा कोट्यधीश ब्रायन जॉन्सन आणि इतर पाहुण्यांना आमंत्रित केलं होतं. मात्र, हवेच्या गुणवत्तेमुळं हैराण झालेल्या ब्रायननं मुलाखत लवकर संपवण्याचा निर्णय घेतला. या लोकांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्यानंतर त्यानं आपल्या निर्णयामागचं कारणही स्पष्ट केलं आहे.
‘भारतात असताना खराब हवेच्या गुणवत्तेमुळं मी हा पॉडकास्ट लवकर संपवला होता. निखिल कामत हे एक चांगले यजमान होते आणि आम्ही खूप छान वेळ घालवत होतो. गडबड अशी झाली की आम्ही ज्या खोलीत बसलो होतो, त्या खोलीत बाहेरची हवा येत होती. ती हवा इतकी खराब होती की मी सोबत आणलेला एअर प्युरिफायर निष्प्रभ झाला,’ असं ब्रायननं एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.
प्रदूषित हवेमुळं भारतात असताना तिसऱ्याच दिवशी माझ्या घशात खवखव आणि जळजळ होऊ लागली. भारतात वायू प्रदूषण ही गोष्ट इतकी सर्रास आहे की त्याचे नकारात्मक परिणाम माहीत असूनही त्याकडं कुणी लक्ष देत नाही,' अशी आश्चर्यवजा खंतही त्यानं व्यक्त केली.
'मास्क लावल्यास प्रदूषणाचे परिणाम टाळता येतात. मात्र, भारतीय लोक मास्क न वापरता सर्रास इकडं-तिकडं फिरतात. अगदी लहान मुलंही प्रदूषित हवेच्या संपर्कात येतात. हे सगळं मला गोंधळात टाकणारं होतं. कर्करोगावर उपचार करण्याऐवजी हवेची गुणवत्ता सुधारून भारत आपल्या लोकसंख्येचं आरोग्य चांगलं राखू शकतो हेच यातून दिसतं, असं ब्रायन जॉन्सननं नमूद केलं आहे.
'अमेरिकेत परतल्यानंतर प्रदूषणाशी संबंधित अडचण दूर झाली खरी, पण दीर्घकाळाचा विचार करता वायू प्रदूषणापेक्षाही वाईट एक गोष्ट आमच्याकडं आहे ती म्हणजे लठ्ठपणा, हेही त्यानं मान्य केलं आहे. अमेरिकेत एकूण लोकसंख्येपैकी ४२.४ टक्के लोक लठ्ठपणाच्या श्रेणीत मोडतात, असं त्यानं पुढं म्हटलंय. अमेरिकन नेते लठ्ठपणाच्या समस्येविरोधात राष्ट्रीय आणीबाणी का जाहीर करत नाहीत? कोणते हितसंबंध आड येतात माहीत नाही, पण ही समस्या संपूर्ण देशासाठीच वाईट आहे, अशी खंतही त्यानं व्यक्त केली.
निखिल कामत यांच्या पॉडकास्टमध्ये ब्रायन जॉन्सन व्यतिरिक्त एक्सेल पार्टनर्सचे संस्थापक भागीदार प्रशांत प्रकाश आणि एफआयटीटीआरचे संस्थापक जितेंद्र चोक्सी, झिरोधाचे दुसरे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन कामत आणि त्यांच्या सीमा कामत देखील सहभागी झाल्या होत्या.
संबंधित बातम्या