Delhi Viral news : राजधानी दिल्ली येथे एका स्टंटमॅनला पोलिसांनी चांगलाच हिसका दाखवला. एक व्यक्ति हा धावत्या दुचाकीच्या टाकीवर त्याच्या मैत्रिणीला बसवून तिच्याशी भर रस्त्यात अश्लील चाळे करत होता. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमांतून या दोघांना अटक करून त्यांना मोठा दंड ठोठावला आहे. ही घटना व्हायरल झाली असून नेटकऱ्यांनी या वर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.
राजधानी दिल्लीतील विकासपुरी येथे ही घटना घडली दुचाकीवरून तरुणीसोबत स्टंट करणाऱ्या तरुणाला वाहतूक पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने २४ तासांत पकडून न्यायालयासमोर हजर करत दंड वसूल केला.
या प्रकरणात तरुणाला ११ हजार रुपयांचा दंड आणि एक ते सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. ही घटना गेल्या सोमवारी घडली. तरुणीसोबत बाईकवर स्टंट करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अशा परिस्थितीत धोकादायक स्टंट करणाऱ्या तरुणाला जबर शिक्षा सुनावण्यात आली आहे. ११ हजार रुपयांच्या दंडासोबत ६ महिने तुरुंगवासाची शिक्षा त्याला सुनावण्यात आली.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आरोपी तरुण हेल्मेट न घालता भरधाव वेगाने दुचाकी चालवत असल्याचं दिसत आहे. त्याच्या बाईकच्या टाकीवर पुढे एक मुलगी बसली होती आणि तिनेही हेल्मेट घातले नव्हते. हा व्हिडिओ दुचाकीच्या मागे बसलेल्या कारचालकाने बनवला आहे. व्हिडिओमध्ये दोघेही बाईकवर अश्लील कृत्य करताना दिसत होते.
व्हायरल झालेला व्हिडिओ विकासपुरी येथील असल्याचे सांगण्यात आले. विशेष आयुक्त अजय चौधरी यांनी दखल घेत कारवाईच्या सूचना दिल्या. अतिरिक्त आयुक्त दिनेश गुप्ता यांनी सांगितले की, वाहतूक पोलिसांनी आधी दुचाकीची नंबर प्लेट शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र मागून येणाऱ्या वाहनाच्या प्रकाशामुळे नंबर प्लेट स्पष्टपणे दिसत नव्हती. यानंतर पोलिसांनी व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केला. कारमध्ये मागे बसलेल्या तरुणाने हा व्हिडिओ बनवल्याचे त्यांना समजले.
पोलिसांनी त्याच्याशी संपर्क साधला. या दुचाकीचा नंबर त्यांच्याकडे नसल्याचे त्यांनी सांगितले, मात्र ही घटना १५ सप्टेंबर रोजी रात्री १ वाजण्याच्या सुमारास घडली. या माहितीच्या आधारे विकासपुरी ते पीरागढी दरम्यानच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. यानंतर दोघेही सापडले. यानंतर दुचाकी स्वाराला दंड ठोठावण्यात आला.