माजी राष्ट्रपती, ज्येष्ठ कॉंग्रेस नेते दिवंगत प्रणव मुखर्जी यांनी लिहिलेल्या दैनंदिनीवर आधारित त्यांची मुलगी शर्मिष्ठा मुखर्जी यांनी लिहिलेले In Pranab, My Father : A Daughter Remembers हे इंग्रजी पुस्तक प्रकाशनापूर्वीच चांगले चर्चेला आलंय. यूपीए सरकारच्या काळात संकटमोचक म्हणून मानले जाणारे प्रणव मुखर्जी आणि कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यादरम्यान कसे तणावपूर्ण संबंध होते, राहुल गांधीविषयी प्रणव मुखर्जी खासगीत काय बोलायचे तसेच गांधी कुटुंबीय मुखर्जींकडे नेहमीच संशयाने पाहत असल्याने पंतप्रधानपदाने त्यांना सतत हुलकावणी दिली, याचे भन्नाट किस्से या पुस्तकात देण्यात आले आहेत. २००४-२०१४ दरम्यान डॉ. मनमोहन सिंह पंतप्रधानपदी असताना प्रणव मुखर्जी हे सरकारमधले ज्येष्ठ सर्वाधिक अनुभव असलेले ज्येष्ठ मंत्री होते. सरकारच्या अनेक कमिट्यांचं अध्यक्षपद त्यांच्याकडे देण्यात आलं होतं. परंतु प्रणव मुखर्जी यांचा डोळा पंतप्रधानपदाकडे होता आणि ते पद न मिळाल्यामुळे त्यांना वाईट वाटायचं, असं या पुस्तकातील घटनांमधून दिसून येतं.
तत्कालीन मनमोहन सिंह सरकारने २०१३ साली गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकप्रतिनिधींना संरक्षण देणारं विधेयक संसदेत संमत केलं होतं. या विधेयकाविरुद्ध राहुल गांधी यांनी कठोर भूमिका घेत विधेयकाची प्रत भर पत्रकार परिषदेत टराटरा फाडून टाकली होती. परिणामी यामुळे सरकारची मोठी नाचक्की झाली होती. या घटनेवर प्रणव मुखर्जी प्रचंड नाराज झाले होते, असं या पुस्तकात म्हटलं आहे. ‘राहुल गांधींमध्ये नेहरु-गांधी कुटुंबीयांच्या वारशाची घमेंड ठासून भरलीय मात्र त्यांच्याएवढी राजकीय परिपक्वता मात्र नाही', अशी प्रतिक्रिया प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या मुलीकडे व्यक्त केली असल्याची आठवण या पुस्तकात देण्यात आली आहे.
किस्से आणि घटनांनी भरलेल्या या पुस्तकात प्रणव मुखर्जी आणि राहुल गांधी यांच्यादरम्यानचा आणखी एक किस्सा लिहिलेला आहे. प्रणव मुखर्जी राष्ट्रपती असताना राहुल गांधी यांनी त्यांना भेटण्यासाठी वेळ मागितला होता. एक दिवस सकाळी राष्ट्रपती भवन परिसरातील मुघल गार्डनमध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी मॉर्निंग वॉक घेत असताना अचानक राहुल गांधी तेथे पोहचले. राहुल गांधींना असं अचानक वेळ न घेता राष्ट्रपती भवनात आलेलं पाहून प्रणव मुखर्जींना आवडलं नव्हतं. परंतु राहुल गांधी यांची भेटण्याची खरी वेळ ही रात्री ८ वाजताची (8 pm) होती. मात्र ते चुकून सकाळी आठ वाजताच (8am) राष्ट्रपती भवनात पोहचले होते. राहुल गांधींकडून AM-PM चा घोळ झाला होता. यावर प्रणव मुखर्जींनी एक कोटी केली होती. आत्ताच AM-PMचा घोळ घालताएत तर मग पुढे जाऊन PM पद कसं सांभाळणार, अशी कोटी प्रणव मुखर्जी यांनी केली होती, अशा आठवण शर्मिष्ठा मुखर्जी यांनी पुस्तकात लिहिली आहे.
प्रणव मुखर्जी यांच्या निधनाच्या काही दिवसांपूर्वी त्यांची मुलगी शर्मिष्ठा मुखर्जी यांनी त्यांना काही प्रश्न विचारले होते. त्यावेळी बोलताना ते म्हणालेले की, ‘मी पंतप्रधानपदाच्या लायक असतानाही आपल्याला ते पद मिळालं नाही. परंतु याची कोणतीही खंत मनात नाही. देवाने मला भरपूर दिलं’ असं ते म्हणाले होते. अशी आठवण शर्मिष्ठा मुखर्जी यांनी या पुस्तकाल दिली आहे. दरम्यान, राष्ट्रपती पदावरून निवृत्त झाल्यानंतर प्रणव मुखर्जी यांनी नागपुरात जाऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात भाग घेतला होता. यावर टीका झाली होती. त्यानंतर केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने प्रणव मुखर्जी यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार जाहीर केला होता. मात्र या समारंभाला गांधी कुटुंबीयांमधून एकही सदस्य उपस्थित राहिला नाही, याची खंतही त्यांनी मुलीजवळ बोलून दाखवली होती.
संबंधित बातम्या