मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Kangana Ranaut : कोर्टात केस सुरू असतानाच कंगना रणौतकडून जावेद अख्तरांचं कौतुक, म्हणाली...

Kangana Ranaut : कोर्टात केस सुरू असतानाच कंगना रणौतकडून जावेद अख्तरांचं कौतुक, म्हणाली...

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Feb 21, 2023 07:46 PM IST

Kangana Ranaut On Javed Akhtar : जावेद अख्तर यांनी कंगना रणौतवर कोर्टात मानहानीचा खटला दाखल केलेला आहे. अख्तर यांच्या एका भाषणाची चर्चा रंगलेली असतानाच आता कंगनानंही त्यात उडी घेतली आहे.

Kangana Ranaut On Javed Akhtar
Kangana Ranaut On Javed Akhtar (HT)

Kangana Ranaut On Javed Akhtar : सतत वादग्रस्त वक्तव्यामुळं आणि राजकीय भूमिकांमुळं चर्चेत राहणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतनं चक्क गीतकार जावेद अख्तर यांचं कौतुक केलं आहे. काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळं जावेद अख्तर यांनी कंगना रणौतवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकला होता. त्यानंतर आता कंगणानं अख्तर यांचं कौतुक केल्यामुळं त्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. जावेद अख्तर हे उर्दू शायर फैज अहमद फैज यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमासाठी पाकिस्तानातील लाहोरमध्ये गेले होते. तिथं त्यांनी व्यासपीठावरून पाकिस्तानी सरकारवर जोरदार टोलेबाजी केली आहे. याशिवाय पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाच्या मुद्द्यावरूनही जावेद अख्तर यांनी पाकिस्तानला खडेबोल सुनावले आहेत. त्यानंतर कंगनानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर करत अख्तर यांचं कौतुक केलं आहे.

कंगनानं शेयर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ज्यावेळी मी जावेद अख्तर साहेबांची कविता ऐकायचे तेव्हा मला वाटायचं की, देवी सरस्वतीचा त्यांच्यावर कायम आशिर्वाद राहिलेला आहे. पण आता बघा माणसात काहीतरी खरेपणा आहे, म्हणूनच त्यांनी त्यांच्यासोबत खुदाई आहे. घरात घुसून मारलं, जय हिंद. असं म्हणत कंगनानं जावेद अख्तर यांचं कौतुक केलं आहे.

पाकिस्तानातील लाहौरमधील कार्यक्रमात बोलताना जावेद अख्तर म्हणाले की, आमच्या मुंबईवर कसा अतिरेकी हल्ला झाला होता, हे अनेकांनी पाहिलेलं आहे. हल्ला करणारे दहशतवादी नॉर्वे किंवा इजिप्तमधून आलेले नव्हते. मुंबईवर हल्ल्याचा डाव आखणारे अनेक आरोपी अद्यापही तुमच्याच देशात मोकाटपणे फिरत आहेत, त्याची भारताकडून नेहमीच तक्रार होते, याचा अनेकांना त्रास होत असतो, असं म्हणत जावेद अख्तर यांनी पाकिस्तानी सरकारला चांगलंच फैलावर घेतलं आहे.

नुसरत फतेह अली खान यांच्यासह मेहदी हसन यांचे असंख्य गायनाचे कार्यक्रम भारतात झालेले आहेत. परंतु भारतरत्न लता मंगेशकर यांचा एकही कार्यक्रम पाकिस्तानात का होऊ शकलेला नाही?, असा सवाल जावेद अख्तर यांनी उपस्थित करताच सभागृहात भयानक शांतता पसरली होती. त्यामुळं आता जावेद अख्तर यांनी लाहोरमध्ये जाऊन पाकिस्तानला सुनावल्यामुळं त्यांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.

IPL_Entry_Point