Sunita Williams : नासाच्या अंतराळ मोहिमेवर गेलेल्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहप्रवासी बुच विल्मोर हे सध्या अंतराळात अडकून पडले आहेत. त्यांना आणण्यासाठी गेलेले स्टारलाइनर (Boing Starliner Spacecraft) हे स्पेसक्राफ्ट रिकाम्या हाती परतल्यामुळं याबाबत चिंता वाढली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर विल्यम्स आणि विल्मोर यांच्या पुढील प्रवासाबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
नासानं विल्यम्स आणि विल्मोर यांना आठ दिवसांच्या मोहिमेवर पाठवलं होतं. त्यांच्या परतीची तारीखही आधीच निश्चित होती. त्यानुसार, त्यांना पृथ्वीवर आणण्यासाठी बोईंगचं स्टारलाइनर हे स्पेसक्राफ्ट ५ जून रोजी पाठवण्यात आलं होतं. ते १४ जून रोजी परतीचा प्रवास सुरू करणार होतं. या वेळापत्रकानुसार विल्यम्स व विल्मोर हे जून महिन्यातच परतणार होते. मात्र, पुढं गडबड झाली.
स्टारलाइनरच्या २८ पैकी ५ थ्रस्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि हेलियम गळती सुरू झाली. ही समस्या सोडविण्यासाठी पृथ्वीवरील अभियंत्यांनी सर्व प्रयत्न करूनही यश आलं नाही. त्यामुळं सुनीता विल्यम्स आणि विल्मोर यांना परत आणण्याची योजना बदलावी लागली. 'स्टारलाइनर'मधून दोन्ही अंतराळवीरांना परत आणणं अत्यंत जोखमीचं असल्याचं नासानं स्पष्ट केलं. या पार्श्वभूमीवर नासानं (Nasa) आपली ८ दिवसांची मोहीम ८ महिन्यांपर्यंत वाढवली. दोन्ही अंतराळवीर आता पुढील वर्षापर्यंत अंतराळ स्थानकात राहणार आहेत. अंतराळात गेलेलं स्टारलाइनर हे यान अंतराळ स्थानकातील काही जुनी उपकरणं आणि स्पेससूट घेऊन पृथ्वीवर परतलं आहे.
विल्मोर आणि विल्यम्स हे आता आणखी काही महिने अंतराळात राहतील. हे लोक दुरुस्ती-देखभालीची कामे आणि प्रयोगांमध्ये मदत करत आहेत. आता ते अंतराळ स्थानकावर इतर सात अंतराळवीरांसोबत काम करत आहेत. या दोघांच्या परतीची वेळही निश्चित करण्यात आली आहे. त्यांना घेण्यासाठी नवं अंतराळयान जाणार आहे. स्पेसएक्सचं हे अंतराळयान पुढील वर्षी म्हणजे फेब्रुवारी २०२५ मध्ये दोन्ही अंतराळवीरांना परत आणणार आहे. स्टारलाइनरच्या परतीच्या पार्श्वभूमीवर विल्यम्स यांनी एक संदेश पाठवला असून स्टारलाइनर मिशन टीमचे आभार मानले आहेत. तुम्ही आम्हाला खूपच सहकार्य केलं, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.