एकेकाळी लठ्ठपणाने त्रस्त असलेल्या आणि त्यानंतर ५ वर्षांतच आपल्या शरीरात मोठा बदल घडवून आणणाऱ्या मॅथ्यू पावलक यांचे निधन झाले आहे. वयाच्या १९ व्या वर्षी मॅथ्यूजला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच मृत्यू झाला. ब्राझीलमध्ये राहणारा मॅथ्यूज बॉडी बिल्डर म्हणून जगभरात ओळखला जात होता आणि त्याची कहाणी व्हायरल व्हायची. अनेक स्पर्धांमध्येही तो जात होता आणि शरीरसौष्ठव समुदायात स्टार म्हणून उदयास येत होता. दक्षिण ब्राझीलच्या सांता कॅटरिना प्रांतात तो विशेष प्रसिद्ध झाला, जिथे तो राहत होता.
टीएमझेडच्या म्हणण्यानुसार, तो नुकताच स्थानिक पातळीवरील स्पर्धांमध्ये चौथ्या आणि सहाव्या क्रमांकावर आला होता. इतकंच नाही तर २३ वर्षांखालील स्पर्धेतही त्याने बाजी मारली होती. पावलक याच्या अकाली मृत्यूमागे स्टेरॉइड्सचे सेवन हे कारणही असू शकते, अशी चर्चा आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या होत्या. सोशल मीडियावरील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, पावलक यांनी आपली तब्येत सुधारण्यासाठी अनेक औषधांचा वापर केला. यामुळे त्याला तब्येतीचा त्रास झाला आणि अखेर त्याला हृदयविकाराचा झटका आला. तर त्यांच्या काही समर्थकांनी अशी चर्चा करणाऱ्यांवर टीका केली आहे.
सोशल मीडियावर पावलक यांच्या एका समर्थकाने म्हटले आहे की, काही लोक अशा व्यक्तीबद्दल असे कसे बोलू शकतात जे आता आपले मत व्यक्त करण्यासाठी जगातच नसतात. पावलक सतत आपल्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनशी संबंधित फोटो सोशल मीडियावर शेअर करत असे. नुकताच त्याने स्वतःचा एक फोटो शेअर करत लिहिलं की, 'तुमचं स्वप्न कितीही कठीण आणि अशक्य आहे हे महत्त्वाचं नाही. जर तुम्हाला खरोखरच ते करायचे असेल तर तुम्ही करू शकाल. मी ते केलं. मॅथियस पावलकचे माजी प्रशिक्षक लुकास शेगाटी यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.
इन्स्टाग्रामवर शेगाटीने लिहिले की, आजचा दिवस खूप दु:खद आहे. आम्ही एक चांगला मित्र गमावला आहे. त्यांच्या निधनाने आम्हा सर्वांनाच धक्का बसला आहे. एक आदरणीय खेळाडू म्हणून उज्ज्वल भवितव्य त्याची वाट पाहत होते. पण त्यांच्या अकाली निधनाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. देवाच्या मनात काय आहे, कोणालाच समजत नाही. माझ्या मनातील व्यथा व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. '