उत्तर प्रदेशातील फर्रुखाबादमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. आंब्याच्या बागेत एकाच दोरीला दोन मुलींचा मृतदेह लटकलेला आढळल्याने परिसरात खळबळ माजली आहे. दोन्ही मुली मैत्रिणी होत्या व एकाच परिसरात रहात होत्या. घटनेचे गांभीर्य पाहून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दोघी मैत्रिणी जन्माष्टमीच्या पूजेसाठी घरातून बाहेर पडल्या होत्या.
भगौतीपूर गावातील निवासी रामवीर जाटव यांची १८ वर्षीय मुलगी बबली आणि महेंद्र जाटव यांची १६ वर्षीय मुलगी शशी मृतावस्थेत आढळल्या आहेत. दोघी बालपणापासूनच्या मैत्रिणी होत्या. दोघी कृष्ण जन्माष्टमीच्या यात्रेसाठी सोमवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घरातून बाहेर पडल्या होत्या. तेव्हापासून त्या बेपत्ता होत्या. कुटूंबीयांनी व ग्रामस्थांनी दोघींचा खूप शोधला घेतला मात्र त्यांच्या काहीच पत्ता लागला नाही. गावातील एक मंदिरात जन्माष्टीचा कार्यक्रम सुरू होता. तेथेही नातेवाईकांनी चौकशी केली मात्र दोघी तेथे आल्या नसल्याचे समजले. दोघींचा रात्रभर गावात व परिसरात शोध घेतला गेला.
फर्रुखाबादचे पोलीस अधीक्षक (एसपी) आलोक प्रियदर्शी यांनी सांगितले की, जिल्ह्यातील कायमगंज पोलीस ठाणे क्षेत्रातील एका गावात आंब्याच्या बागेत दोन मुलींचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत मिळाले. त्यांनी सांगितले की, दोन्ही मुली एकाच जातीतील तसेच एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी होत्या. दोन्ही मुली गावातील एका मंदिरातून बेपत्ता झाल्या होत्या. या मुली सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास श्रीकृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम पाहायला गेल्या होत्या, मात्र घरी परतल्याच नाहीत.
पोलिसांनी सांगितले की, मुलींच्या नातेवाईकांनी त्यांचा रात्रभर शोध घेतला. मात्र त्यांचा काहीच पत्ता लागला नाही. मंगळवारी सकाळी दोन्ही मुलींचे मृतदेह आंब्याच्या बागेत एकाच फांदीला लटकलेले दिसले. मुलीचा मोबाइल फोन झाडाच्या जवळ सापडला. दोन्ही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले प्रकरणाचा तपास केला जात आहेत.