BMW कारच्या धडकेत दोन स्कूटीस्वार तरुणी ठार; रक्तबंबाळ तरुणींना रस्त्यावर सोडून ड्रायव्हर पळून गेला-bmw car hit two girls riding on scotty in indore ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  BMW कारच्या धडकेत दोन स्कूटीस्वार तरुणी ठार; रक्तबंबाळ तरुणींना रस्त्यावर सोडून ड्रायव्हर पळून गेला

BMW कारच्या धडकेत दोन स्कूटीस्वार तरुणी ठार; रक्तबंबाळ तरुणींना रस्त्यावर सोडून ड्रायव्हर पळून गेला

Sep 16, 2024 04:50 PM IST

भरधाव बीएमडब्ल्यू कारच्या धडकेत दोन तरुणींचा करुण अंत झाल्याची दुर्दैवी घटना मध्य प्रदेशातील इंदूर शहरात घडली आहे. स्कूटीवर स्वार या तरुणी मेळ्यातून घरी परतत जात होत्या.

बीएमडब्ल्यू कारच्या धडकेत स्कूटीवर स्वार दोन तरुणी ठार
बीएमडब्ल्यू कारच्या धडकेत स्कूटीवर स्वार दोन तरुणी ठार

देशात हिट अँड रनच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. मध्य प्रदेशातील इंदूर शहरात काल, रविवारी रात्री हिट अँड रनच्या घटनेत दोन तरुणींचा बळी गेला. भरधाव बीएमडब्ल्यू कारच्या दिलेल्या धडकेत स्कूटीवर स्वार दोन तरुणी ठार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बीएमडब्ल्यूच्या ड्रायव्हरला अटक करण्यात आली आहे. गजेंद्र प्रताप सिंह (वय २८) असे या बीएमडब्ल्यू कारच्या ड्रायव्हरचे नाव असून तो मूळचा मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरचा रहिवासी आहे. सध्या तो इंदूरच्या सनसिटी येथे राहत होता, अशी माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त कुंदन मंडलोई यांनी दिली.

एका मित्राच्या वाढदिवसानिमित्त केक देण्याची बीएमडब्ल्यूच्या ड्रायव्हरला घाई झाली होती. त्यामुळेच त्याने चुकीच्या दिशेने गाडी घातली होती, असं पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. अपघात झाल्यानंतर बीएमडब्ल्यू कारचा ड्रायव्हर खजाराना येथील घटनास्थळावरून कार घेऊन पळून गेला होता. इंदूर पोलिसांनी शोध मोहीम राबवून आरोपी ड्रायव्हरला अटक केली. 

आरोपी ड्रायव्हर गजेंद्र प्रताप सिंह हा इंदूर शहरात एका बीपीओमध्ये काम करतो. त्याने नुकतीच सेकंड हँड बीएमडब्ल्यू कार विकत घेतली होती. ड्रायव्हरविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०५ (सदोष मनुष्यवध) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपघात कसा झाला?

इंदूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मी तोमर (वय २४) आणि दीक्षा जादों (वय २५) या दोन तरुणी रविवारी रात्री अकरा वाजता खजराना येथील गणेश मंदिर परिसात आयोजित जत्रेत सहभागी होऊन स्कूटरवरून घरी परतत होत्या. मात्र चुकीच्या दिशेने भरधाव येत असलेल्या बीएमडब्ल्यू कारने त्यांच्या स्कूटीला समोरासमोर धडक दिली. धडकेमुळे दोन्ही तरुणी रस्त्यावर फेकल्या गेल्या. अपघाता त्या गंभीर जखमी झाल्या. तरुणींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती खजराना पोलिस ठाण्याचे प्रभारी मनोज सिंह सेंधव यांनी दिली. यापैकी लक्ष्मी तोमर ही मूळची शिवपुरीची रहिवासी होती. इंदूरमध्ये राहून ती नोकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होती. गेल्या वर्षी तिच्या वडिलांचे निधन झाले होते. तेव्हापासून लक्ष्मी तोमर ही कुटुंबातील एकमेव कमावती सदस्य आहे. तर दीक्षा जाडोन ही मूळची ग्वाल्हेरची रहिवासी होती. इंदूरमधील एका सार्वजनिक क्षेत्रातील बँकेच्या शाखेत ती काम करत होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Whats_app_banner