blinkit viral news : भारतात भाज्या या प्रामुख्याने भाजी मंडईतून किंवा मार्केटमधून खरेदी केल्या जातात. या ठिकाणी ताजा भाजीपाला खरेदी करण्यावर नगरिकांचा भर असतो. भाजी घेताना कोथिंबीर आणि हिरवी मिरची फुकट मागण्याचा ट्रेंड अनेक जिल्ह्यात आहे. दरम्यान, ऑनलाइन रिटेल सेवा आल्यानंतर लोकांना येथे कोथिंबीर किंवा मिरची फुकट दिली जात नव्हती. त्यामुळे भाजी मंडई प्रमाणेच आता ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ई-टेलर ब्लिंकिटने भाजीपाला खरेदी करताना मोफत कोथिंबीर देण्यास सुरुवात केली आहे. झोमॅटोच्या मालकीच्या या ऑनलाइन जलद वितरण कंपनी ब्लिंकिटने म्हटले आहे की ऑनलाइन भाजी खरेदी करणाऱ्यांना मोफत कोथिंबीर दिली जाणार असल्याने त्यांचा भाजी खरेदीचा अनुभव आता भन्नाट होणार आहे.
एका वापरकर्त्याचा संदर्भ देत, ब्लिंकिटचे सीईओ अल्बिंदर धिंडसा म्हणाले की त्यांच्या डिलिव्हरी ॲपवर कोथिंबीर जुडी आता भाजी खरेदीवर मोफत दिली जाणार आहे. एका युजरने सर्वप्रथम धिंडसा यांना सोशल मीडियावर टॅग केले आणि लिहिले, "ब्लिंकिटवर कोथिंबिरीसाठी पैसे द्यावे लागल्याने माझ्या आईला छोटा हार्ट अटॅक आला. ट्रॅव्हल इंडस्ट्रीतील व्यावसायिक सावंत यांनी अल्बिंदर धिंडसा यांना टॅग केले आणि ते म्हणाले, "आई सुचवत आहे की तुम्ही ठराविक प्रमाणात भाज्यांसोबत मोफत कोथिंबीर द्यावी. त्यानंतर धिंडसा यांनी ही घोषणा केली.
खरं तर, दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि बेंगळुरूसह भारतातील अनेक भागांमध्ये भाजी घेतांना मोफत कोथिंबीर आणि मिरची मागणे ही परंपरा आहे. इंडिया टुडेच्या अहवालानुसार, दिल्लीच्या जीके मधील भाजी विक्रेते हरीश यांनी सांगितले की, ते भाज्यांसोबत मोफत देण्यासाठी २.५ किलो मिरची आणि ३.५ किलो कोथिंबीर दररोज विकत घेतात. त्याच्या पुशकार्टमध्ये सुमारे २०० किलो फळे आणि भाज्या आहेत.
"मोफत कोथिंबीर आणि मिरची मागणे ही दिल्लीतील परंपरा आहे. माझ्या वडिलांनी ३७ वर्षांपूर्वी भाजीपाला विकायला सुरुवात केली आणि तेव्हापासून आम्ही मोफत मिरची आणि कोथिंबीर देत आहोत," हरीशने इंडिया टुडेला माहिती देतांना सांगितले.
नोएडा सेक्टर १२२ मधील भाजी विक्रेते सुनील प्रकाश या बाबत माहिती देतांना म्हणाले, दर कमी असताना ते कोथिंबीर आणि मिरची मोफत देतात. जेव्हा ग्राहक कोथिंबीर आणि मिरची मागतात तेव्हा आम्ही त्यांना ती मोफत देतो. कोथिंबीर आणि मिरचीची किंमत भरून काढण्यासाठी आम्ही पुढील भाजीपाला ग्राहकाला थोड्या जास्त भावाने विकतो."
संबंधित बातम्या