मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Amit Shah : बहुमत न मिळाल्यास भाजपचा प्लान बी काय असेल?; अमित शहा काय म्हणाले पाहा!

Amit Shah : बहुमत न मिळाल्यास भाजपचा प्लान बी काय असेल?; अमित शहा काय म्हणाले पाहा!

May 17, 2024 12:27 PM IST

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या एका मुलाखतीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपच्या पुढील रणनीतीवर भाष्य केलं आहे.

बहुमत न मिळाल्यास भाजपचा प्लान बी काय असेल?; अमित शहा काय म्हणाले पाहा!
बहुमत न मिळाल्यास भाजपचा प्लान बी काय असेल?; अमित शहा काय म्हणाले पाहा! (PTI)

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये भारतीय जनता पक्षाला बहुमताचा आकडा गाठता न आल्यास तुमच्याकडं काही प्लॅन बी तयार आहे का? या प्रश्नाचं उत्तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी दिलं आहे. तशी काही गरज वाटत नसल्याचं शहा यांनी म्हटलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०१४ आणि २०१९ सालच्या निवडणुका बहुमतानं जिंकल्यानंतर आता पुन्हा एकदा भाजप निर्विवाद बहुमत मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. भाजपनं 'अबकी बार, ४०० पार' असं घोषणाच केली आहे. मात्र, यावेळचं चित्र आधीच्या निवडणुकांपेक्षा काहीसं वेगळं आहे. 

भाजपच्या विरोधात देशात विरोधी पक्षाची इंडिया आघाडी ताकदीनं उभी राहिली आहे. भाजपनं देशभरात चालवलेलं फोडाफोडीचं राजकारण आणि भ्रष्ट नेत्यांना पक्षात घेतल्यामुळं जनमानसात काहीसा नकारात्मक सूर आहे. त्यामुळं भाजपनं ४०० पारची घोषणा दिली असली तरी हा पक्ष २०० च्या पुढं जाणार नाही, असा दावा विरोधक करत आहेत. तसं झाल्यास नेमकं कसं चित्र असेल? भाजपची भूमिका नेमकी काय असेल याबद्दलही उत्सुकता आहे.

अमित शहा यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत त्यांना नेमका हाच प्रश्न विचारण्यात आला. भाजपकडं प्लान बी काय आहे, असं त्यांना विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. 'प्लॅन ए यशस्वी होण्याची शक्यता ६० टक्क्यांपेक्षा कमी असेल तरच प्लॅन बी बनवण्याची गरज असते. इथं त्याची गरज नाही, असं शहा म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपला शतप्रतिशत प्रचंड बहुमत मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 'जगात सन्मान वाढला पाहिजे. देश सुरक्षित, विकसित, समृद्ध, आत्मनिर्भर झाला पाहिजे, असं प्रत्येक देशवासीयाला वाटतं. गेल्या दहा वर्षात हे सगळं झालंय, देशाचा सन्मान वाढलंय हे लोकांनी पाहिलं आहे, असं अमित शहा म्हणाले.

बहुमताचा आकडा किती?

केंद्रात सत्तेत येण्यासाठी एखाद्या पक्षाला किंवा आघाडीला ५४३ सदस्यांच्या लोकसभेत किमान २७२ जागा (५४३ पैकी ५० टक्क्यांपेक्षा जास्त) जिंकणं आवश्यक आहे. २०१९ मध्ये भाजपला ३०३ जागा मिळाल्या होत्या, तर भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) ३५३ जागा मिळाल्या होत्या.

टी-२० वर्ल्डकप २०२४