शपथ घेतल्यानंतर काही तासांतच मत बदललं! सुरेश गोपी मंत्रिपद सोडणार? असं काय घडलं?
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  शपथ घेतल्यानंतर काही तासांतच मत बदललं! सुरेश गोपी मंत्रिपद सोडणार? असं काय घडलं?

शपथ घेतल्यानंतर काही तासांतच मत बदललं! सुरेश गोपी मंत्रिपद सोडणार? असं काय घडलं?

Jun 10, 2024 02:34 PM IST

suresh gopi news : केरळमधील भाजपचे एकमेव खासदार, अभिनेते सुरेश गोपी यांनी शपथविधीनंतर काही तासांतच मंत्रीपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

शपथ घेतल्यानंतर काही तासांतच मत बदललं! सुरेश गोपी सोडणार मंत्रिपद, असं काय घडलं?
शपथ घेतल्यानंतर काही तासांतच मत बदललं! सुरेश गोपी सोडणार मंत्रिपद, असं काय घडलं? (PTI)

Suresh Gopi to quit Modi cabinet : तेलुगू देसम पक्ष लोकसभा अध्यक्षपदावर अडून बसल्यानं उलटसुलट चर्चा सुरू असतानाच केरळमधून भाजपची चिंता वाढवणारी बातमी आली आहे. केरळमधील नवनिर्वाचित खासदार, अभिनेते सुरेश गोपी यांनी शपथविधीनंतर काही तासांतच मंत्रिपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

केरळ काँग्रेसनं एक व्हिडिओ क्लिपद्वारे हा दावा केला आहे. सुरेश गोपी यांना चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी मंत्रिपद नको आहे, असं काँग्रेसनं म्हटलं आहे. भाजपकडून अद्याप यावर अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

सुरेश गोपी यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्रिशूर लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. ते भाजपचे केरळमधील एकमेव खासदार ठरले आहेत. एकमेव खासदार असल्यानं साहजिकच एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळात त्यांची वर्णी लागली आहे. रविवारी त्यांनी शपथही घेतली.

त्रिशूर लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवल्यानंतर गोपी यांनी मीडियाला प्रतिक्रिया दिली होती. 'खासदार म्हणून मी विविध खात्यांची कामं करू शकतो. पण मला मंत्री व्हायचे नाही. कामं करण्यासाठी अनेक वेगळी व्यासपीठं असू शकतात, असं ते म्हणाले होते. केरळच्या जनतेसाठी जेव्हा मी निर्धारानं एखादा प्रकल्प घेऊन जाईन, तेव्हा संबंधित मंत्रालयांनी त्याची अंमलबजावणी करावी, एवढीच माझी इच्छा आहे, असंही त्यांनी म्हटलं होतं.

ही तर मतदारांची चेष्टा

गोपी यांनी मंत्रिपद सोडण्याची इच्छा व्यक्त केल्यावरून केरळ काँग्रेसनं नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. हे मतदारांची खिल्ली उडवण्यासारखं नाही का? तुमच्या खासदाराला आयुष्यात काय करायचं आहे हे आधी विचारायला हवं होतंं. देवाच्या आणि राज्यघटनेच्या नावानं शपथ घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांसमोर हा शो थांबवा, असं पंतप्रधान आणि भाजप त्यांच्या खासदाराला का सांगत नाही?,' असा सवाल काँग्रेसनं केला आहे.

गोपी यांंचा ७४ हजार मतांनी विजय

मल्याळी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते असलेले सुरेश गोपी यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्रिशूर मतदारसंघातून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार व्हीएस सुनीलकुमार यांचा पराभव केला आहे. गोपी यांच्या विरोधातील आणखी एक उमेदवार काँग्रेसचे के. मुरलीधरन तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. गोपी यांना ४ लाख १२ हजार ३३८ मतं मिळाली होती. त्यांनी सुनीलकुमार यांचा ७४ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. विशेष म्हणजे केरळमध्ये भाजपनं पहिल्यांदाच लोकसभेची जागा जिंकली आहे.

Whats_app_banner
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर