BJP President : दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर भाजप नव्या राष्ट्रीय अध्यक्षाची नियुक्ती करणार आहे. पक्षाच्या अध्यक्षपदाची निवड १० ते २० फेब्रुवारी दरम्यान होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विद्यमान अध्यक्ष जेपी नड्डा दिल्ली निवडणुकीपर्यंत भाजपचे अध्यक्ष राहणार आहेत. जानेवारी २०२४ मध्ये त्यांचा पक्षाचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला. मात्र, पण लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नड्डा यांचा कार्यकाळ एक वर्षासाठी वाढवण्यात आला होता.
भाजपच्या संघटनात्मक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. राष्ट्रीय परिषद आणि राज्य परिषदेचे सदस्य सध्या निवडले जात आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष निवडीपूर्वी किमान ५० टक्के राज्य संघटनांना संघटनात्मक निवडणुका पूर्ण कराव्या लागणार आहेत. आतापर्यंत केवळ चार राज्यांनी आपापल्या प्रदेशाध्यक्ष निवडीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. भाजप नेत्यांच्या म्हणण्यानुसार, संघटनात्मक निवडणुका त्यांच्या वेळापत्रकानुसार होणार आहेत. तसेच त्या वेळेत पूर्ण होतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या मान्यतेने भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड केली जाणार आहे. या शर्यतीत आतापर्यंत अनेक नावे समोर आली आहे. मात्र, भाजपकडून अद्याप कोणत्याही नावाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर, शिवराजसिंह चौहान आणि पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडे यांची नावे चर्चेत आहेत. याशिवाय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे ही नाव भाजपच्या अध्यक्ष पदासाठी चर्चेत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद तावडे आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत भूपेंद्र यादव यांच्यापैकी एकाची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.
गेल्या संघटनात्मक निवडणुकीत धर्मेंद्र प्रधान आणि भूपेंद्र यादव यांची नावेही चर्चेत होती, पण अखेर ही जबाबदारी जेपी नड्डा यांच्याकडे सोपविण्यात आली. या तिन्ही नेत्यांनी पक्षांतर्गत कामातून मोठा अनुभव गोळा केला आहे. भूपेंद्र यादव हे मूळचे राजस्थानचे रहिवासी आहेत. तर धर्मेंद्र प्रधान हे ओडिशाचे आहेत. विनोद तावडे मूळचे महाराष्ट्राचे आहेत. हे तिन्ही नेते अमित शहा यांचे निकटवर्तीय मानले जातात.
पक्षाच्या घटनेनुसार जे सदस्य पक्षाचे किमान १५ वर्षे सदस्य आहेत, तेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतात. यापूर्वी नितीन गडकरी हे २०१० ते २०१३ या काळात पक्षाचे अध्यक्ष होते. राजनाथ सिंह हे २००५ ते २००९ आणि पुन्हा २०१३ ते १४ या काळात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. अमित शहा यांनी २०१४ ते २०२० या कालावधीत भाजपचे अध्यक्षपद भूषवले होते.
संबंधित बातम्या