'आप'चे राष्ट्रीय संयोजक व दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाबवर लक्ष केंद्रीत केल्याचा दावा भारतीय जनता पक्षाने केला आहे. आमदारांच्या माध्यमातून दबाव आणून केजरीवाल पंजाबचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहत असल्याचा दावा केला जात आहे. विशेष म्हणजे दिल्ली विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर केजरीवाल यांनी पंजाबचे मंत्री आणि आमदारांची बैठक बोलावली होती.
भाजप नेते मनजिंदर सिंह सिरसा म्हणाले, 'दिल्ली निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत पंजाबच्या आमदारांची बैठक बोलावली होती. भगवंत मान यांना नालायक , अयोग्य म्हणत महिलांना हजार रुपये देण्याचे आश्वासन त्यांनी पूर्ण केले नाही, पंजाबमधील अंमली पदार्थ तस्करीला आळा घालता येत नाही, पंजाबमध्ये कायदा व सुव्यवस्था ढासळत चालली आहे. असं म्हणत ते भगवंत मान यांना हटवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि अरविंद केजरीवाल हे चांगले माणूस आहेत असं आपल्या आमदारांना सांगून ते पंजाबचे मुख्यमंत्री बनवण्याचं स्वप्न पाहत आहेत.
मनजिंदर सिंह सिरसा म्हणाले की, मी अरविंद केजरीवाल यांना सांगू इच्छितो की, हा पंजाब आहे. चुकूनही असे स्वप्न पाहू नका. पंजाबची जनता कोणत्याही परिस्थितीत हे सहन करणार नाही आणि तुम्हाला असे होऊ देणार नाही. मी भगवंत मान यांनाही सांगू इच्छितो की, अशा घटना घडण्यापूर्वी तुम्ही सतर्क राहा. अरविंद केजरीवाल कोणाच्याही जवळचे नाहीत. कुमार विश्वास असो वा कोणताही आमदार, त्यांनी सर्वांचा विश्वासघात केला आहे आणि आता ते पंजाबच्या जनतेची फसवणूक करतील.
सिरसा यांनी दिल्लीतील राजौरी गार्डन विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे. त्यांनी 'आप'च्या नेत्या ए. धनवंती चंडिला यांचा १८ हजार मतांनी पराभव केला. सिरसा यांना ६४ हजार १३२ मते मिळाली.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचे शनिवारी (८ फेब्रुवारी) जाहीर झाले. भाजपने दिल्लीत ऐतिहासिक विजय मिळवत आम आदमी पक्षाची १० वर्षापासूनची सत्ता उखडून फेकली. भाजपाने २७ वर्षांनंतर देशाच्या राजधानीत पुन्हा एकदा सत्ता मिळवली आहे. भाजपाने ७० पैकी ४८ जागांवर विजय मिळवला, तर आम आदमी पक्षाला २२ जागा जिंकता आल्या. सलग तिसऱ्या निवडणुकीत दिल्लीत काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नाही.
संबंधित बातम्या