LK Advani Health Updates: माजी उपपंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना बुधवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ. विनित सूरी यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आठवड्याच्या सुरुवातीला अडवाणी यांना वृद्धापकाळामुळे २६ जून रोजी नवी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) दाखल करण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. युरोलॉजी, कार्डिओलॉजी आणि जेरियाट्रिक मेडिसिनसह विविध स्पेशालिटीजमधील डॉक्टरांच्या टीमने ९६ वर्षीय अडवाणी यांची वैद्यकीय तपासणी केली.
८ नोव्हेंबर १९२७ रोजी कराची (सध्याचा पाकिस्तान) येथे जन्मलेल्या लालकृष्ण अडवाणी यांना नुकताच ३० मार्च २०२४ रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात आले. अडवाणी यांनी १९४२ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघात स्वयंसेवक म्हणून प्रवेश करून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली. १९७० मध्ये राज्यसभेवर निवडून आल्यानंतर त्यांनी आपल्या संसदीय कारकिर्दीला सुरुवात केली. १९८९ मध्ये त्यांनी मोहिनी गिरी यांचा पराभव करत नवी दिल्लीतून लोकसभेची पहिली निवडणूक लढवली.
अडवाणी यांनी १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला अयोध्येतील राम मंदिरासाठी रथयात्रा काढून भाजपला राष्ट्रीय स्तरावर स्थान मिळवून दिले. अटलबिहारी वाजपेयी यांच्या राजवटीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारच्या काळात अडवाणी यांनी उपपंतप्रधान आणि गृहमंत्री म्हणून काम पाहिले होते. १९८६ ते १९९०, त्यानंतर १९९३ ते १९९८ आणि २००४ ते २००५ या काळात त्यांनी भाजपचे अध्यक्षपद भूषवले. १९८० मध्ये पक्षाच्या स्थापनेपासून सर्वात जास्त काळ अडवाणी यांनी पक्षाचे अध्यक्षपद भूषवले होते. २००५ मध्ये लाहोर दौऱ्यात पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्ना यांची स्तुती केल्यामुळे झालेल्या गदारोळानंतर त्यांना पक्षप्रमुखपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेशी ते बांधील असले, तरी त्यांच्या वक्तव्यामुळे त्यांच्यात आणि पक्षाच्या वैचारिक नेत्यांमध्ये तात्पुरता दुरावा निर्माण झाला. गेल्या काही वर्षांत आरोग्याच्या कारणास्तव त्यांनी सक्रिय राजकीय कार्यक्रमांपासून एक पाऊल मागे घेतले आहे.
संबंधित बातम्या