Rahul Gandhi : ‘अमेरिकेतील भाषणात शीख समुदायाबद्दल मी काहीही चुकीचं बोललेलो नव्हतो. भारतीय जनता पक्षाचे लोक माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून खोटंनाटं पसरवत आहेत,’ असा पलटवार काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे.
राहुल गांधी यांनी परदेशात जाऊन शीख बांधवांचा अपमान केल्याचा दावा करत भाजपनं देशभरात निदर्शनं केली होती. त्यावर राहुल गांधी यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. ज्या भाषणावरून भाजपनं हा आरोप केला होता, त्या भाषणाचा व्हिडिओच राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
'भाजपवाले साफ खोटं बोलत आहेत. मी भारतातील आणि जगभरातील प्रत्येक शीख बंधू-भगिनींना विचारू इच्छितो की, मी जे बोललो त्यात काही चुकीचं आहे का? प्रत्येक शीख आणि प्रत्येक भारतीय निर्भयपणे आपापल्या धर्माचं आचरण करू शकेल असा भारत असावा असं अपेक्षा करणं चुकीचं आहे का?, असा प्रश्न त्यांनी केला.
'भाजपनं नेहमीप्रमाणे खोटारडेपणाचा आधार घेतला आहे. मला गप्प करण्यासाठी ते जंगजंग पछाडत आहेत. कारण, त्यांना सत्य सहन होत नाही. सत्याचा सामना करण्याची हिंमत त्यांच्यात नाही. पण भारताची ओळख असलेल्या विविधतेत एकता, समानता आणि प्रेम या मूल्यांसाठी मी नेहमीच बोलणार आहे, असं राहुल यांनी ठणकावलं.
व्हर्जिनिया इथं भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिकांच्या मेळाव्याला संबोधित करताना राहुल गांधी यांनी भारतातील अल्पसंख्याक समुदायांसमोरील आव्हानांवर प्रकाश टाकला होता. ‘जिथं विशिष्ट धर्म, विशिष्ट भाषा आणि विशिष्ट समुदायांना गौण समजलं जाईल, असा भारत भाजपचा वैचारिक कणा असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (RSS) हवा आहे, असं राहुल म्हणाले होते. 'ही लढाई राजकारणाची नाही, राजकारण हा केवळ मुखवटा आहे. खरी लढाई विविध धर्मीयांना त्यांना श्रद्धांचं पालन करण्याचं स्वातंत्र्य असेल की नाही ही आहे. शीख बांधवांना पगडी, कडा घालून भारतातील गुरुद्वारात जाण्याची परवानगी मिळेल का, याची ही लढाई आहे, असं ते म्हणाले होते. 'काही राज्ये इतर राज्यांपेक्षा कमी महत्त्वाची आहेत, काही भाषा इतर भाषांपेक्षा दुय्यम आहेत, काही समुदाय इतर समुदायांपेक्षा खालच्या दर्जाचे आहेत, असं आरएसएस मानतो. आमच्या दृष्टीनं सगळेच समान आहेत. सगळेच महत्त्वाचे आहेत. भारत कसा असेल यासाठीची ही लढाई आहे, असं ते म्हणाले होते.