Rahul Gandhi Jalebi : हरयाणातील विजयामुळं भारतीय जनता पक्षात सध्या जल्लोषाचं वातावरण आहे. पराभवाच्या धक्क्यात असलेल्या काँग्रेसच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम सध्या भाजपचे कार्यकर्ते आणि पाठीराखे करत आहेत. भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दिल्लीतील घरी एक किलो जिलेबी पाठवून दिली आहे. त्या जिलेबीसाठी स्विगीला दिलेलं बिलही सोशल मीडियावर शेअर केलं आहे. हे बिल सध्या व्हायरल होत आहे.
हरयाणा विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा एकतर्फी विजय होईल असं वातावरण निकाल लागेपर्यंत होतं. ‘एक्झिट पोल’मध्येही तसाच अंदाज वर्तवण्यात आला होता. मतमोजणी सुरू झाल्यानंतर सुरुवातीला काँग्रेसनं आघाडीही घेतली. त्यामुळं 'आपण जिंकलोच' असं वाटून काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला. ढोल-ताशे वाजवून एकमेकांना जिलेबी खाऊ घातली जाऊ लागली. मात्र, काही वेळातच आकडे बदलले.
सुरुवातीला आघाडीवर असलेली काँग्रेस नंतर पिछाडीवर गेली. भाजपच्या जागा वाढत गेल्या. दोन्ही पक्षाच्या जागांमधील अंतर मोठ्या प्रमाणात वाढलं आणि भाजपनं अनपेक्षितरित्या बाजी मारली. काँग्रेससाठी हा पराभव जितका धक्कादायक होता, तितकाच भाजपसाठी विजय धक्कादायक होता. त्यामुळं भाजपकडून जल्लोष सुरू आहे.
भाजपच्या विजयानंतर सोशल मीडियावर 'जिलेबी' हा शब्द ट्रेंड होऊ लागला आणि भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधण्यासाठी जिलेबीचाच आधार घेतला. भाजपच्या काही नेत्यांनी जलेबी खातानाचे फोटो पोस्ट केले, तर काहींनी आपल्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी गोड पदार्थ बनवण्याचा प्रयत्न केला.
आसाम भाजपच्या एका कार्यकर्त्यानं शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पक्षाचा एक कार्यकर्ता हातात पाकीट घेऊन लखीमपूरमधील काँग्रेस कार्यालयात जाताना दिसत आहे.
हरियाणा भाजपनं स्विगीवर दिलेल्या फूड डिलिव्हरी ऑर्डरचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. दिल्लीतील कनॉट प्लेसमधील बिकानेरवाला इथून एक किलो जिलेबीची ऑर्डर अकबर रोडवरील राहुल गांधी यांच्या घरी पोहोचवण्यात येणार असल्याचा तो स्क्रीनशॉर्ट आहे.
ऑर्डर घेण्यात आली असून ती पूर्ण करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असं त्यात दिसत आहे आणि डिलिव्हरीवर रोख पेमेंटसाठी चिन्हांकित केलं गेलं आहे.
हरयाणा भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं राहुल गांधी यांच्या घरी जिलेबी पाठवण्यात आली आहे.
हरयाणातील निवडणूक प्रचाराच्या काळात राहुल गांधी यांनी एका दुकानात जिलेबी खाल्ली होती. त्या जिलेबीचं राहुल गांधी यांनी कौतुक केलं होतं. 'मी गाडीत जलेबीचा आस्वाद घेतला आणि माझी बहीण प्रियांकाला निरोप पाठवला की आज मी माझ्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट जलेबी खाल्ली आहे. मी तुमच्यासाठीही जिलेबीचा डबा घेऊन येत आहे,' असं राहुल यांनी म्हटलं होतं. त्यानंतर भाजपनंही जिलेबीचा वापर करून काँग्रेसवर टीका सुरू केली. त्यामुळं हा शब्द सोशल मीडियावर ट्रेड होत होता.