मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  'राज ठाकरेंनी संधी गमावली', अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे BJP खासदार संतप्त

'राज ठाकरेंनी संधी गमावली', अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे BJP खासदार संतप्त

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
May 20, 2022 02:49 PM IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केला होता.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ५ जूनचा नियोजित दौरा स्थगित
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ५ जूनचा नियोजित दौरा स्थगित (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला तुर्तास स्थगिती देण्यात आली आहे. याबाबत राज ठाकरे पुण्यात होणाऱ्या सभेत सविस्तर बोलणार आहेत. दरम्यान, आता त्यांच्या या अचानक दौरा रद्द करण्यावरूनही टीका केली जात आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खोचक टोला लगावताना म्हटलं की, "दौरा स्थगित कशाला करायचा? आम्ही मदत केली असती." काँग्रेसने टीका करताना राज ठाकरे यांच्या नामुष्कीला भाजपच जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची घोषणा झाल्यापासून मोठ्या प्रमाणावर विरोध केलेल्या उत्तर प्रदेशातील भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी संताप व्यक्त केला आहे.

बृजभूषण सिंह म्हणाले की, "माफी न मागणाऱ्या राज ठाकरे यांनी जुन्या जखमा ताज्या केल्या आहेत. ते दुर्दैवी व्यक्ती आहेत. राज ठाकरेंकडे एक संधी होती ती त्यांनी गमावली. इथल्या लोकांची, योगी आदित्यनाथ यांची, पंतप्रधान मोदींची माफी मागितली असती तर उत्तर प्रदेशच्या लोकांचा राग कमी झाला असता. मात्र माफी न मागता त्यांनी पुन्हा जुनी जखम ताजी केली आहे. त्यामुळे मी ठरवलं आहे की माझा कोणताही कार्यक्रम स्थगित करणार नाही."

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करताना बृजभूषण यांनी उत्तर प्रदेशात स्थानिकांना ५ जूनला अयोध्येत येण्याचं आवाहन केलं होतं. उत्तर भारतीयांचा अपमान करणाऱ्या राज ठाकरे यांना उत्तर देण्यासाठी अयोध्येत या असं म्हणत त्यांनी नागरिकांना साद घातली होती. त्यानतंर राज ठाकरे यांनी माफी मागावी अन्यथा उत्तर प्रदेशात पाय ठेवू देणार नाही असा इशारासुद्धा बृजभूषण सिंह यांनी दिला होता.

बृजभूषण यांनी म्हटलं की, ५ जून रोजी आम्ही अयोध्येला जाणार असून शरयू नदीत स्नान करणार आहे. तिथे साधु संतांसोबत पूजापाठ होतील. राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा स्थगित केला असला तरी आम्ही तिथे नक्की जाऊ. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा वाढदिवस साजरा करणार असल्याचंही त्यांनी सांगितले.

IPL_Entry_Point