Giriraj Singh Controversial Statement : बिहारच्या बेगूसराय, औरंगाबाद आणि छपरा जिल्ह्यांत नवरात्री उत्सवावेळी दोन गटात तुफान राडा झाल्याची घटना समोर आली आहे. त्यावरून सत्ताधारी जेडीयू-राजद आणि भाजपात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. त्यातच आता बेगूसरायचे खासदार आणि केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी वादग्रस्त वक्तव्य करत नव्या वादाला तोंड फोडलं आहे. सगळे मुसलमान पाकिस्तानात गेले असते तर आज ही दुर्दशा झालीच नसती. आपल्या पूर्वजांनी केलेल्या चुकीचे परिणाम सध्या आपल्याला भोगावे लागत आहे, बिहार सरकार लांगूलचालनाचं धोरण अवलंबवत असल्यानेच अशा घटना घडत असल्याचं मंत्री गिरिराज सिंह यांनी म्हटलं आहे. त्यामुळं आता यावरून नवा राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे.
माध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह म्हणाले की, ज्यावेळी देशाची फाळणी झाली, त्यावेळी आपल्या पूर्वजांनी मोठी चूक केली आहे. फाळणीच्या वेळीच जर सगळे मुसलमान पाकिस्तानात गेले असते तर आज भारताची अशी दुर्दशा झालीच नसती. आम्हाला जातींमध्ये विभागलं जात असून ते धर्म विचारून लोकांचे गळे चिरत असल्याचं सांगत गिरिराज सिंह यांनी नव्या वादाला तोंड फोडलं आहे. बिहार सरकारच्या लांगूलचालनाच्या धोरणामुळंच राज्यात धार्मिक यात्रांवर हल्ले आणि दगडफेकींच्या घटना घडत आहे. बेगूसरायमध्ये हिंदुंच्या शिवलिंगवर हल्ला झाला आणि त्या प्रकरणात चार हिंदुंना गोवण्यात आल्याचा आरोपही गिरिराज सिंह यांनी केला आहे.
शिवलिंगच्या जागी एखाद्या दुसऱ्या धार्मिक स्थळावर हल्ला झाला असता तर संपूर्ण बेगूसरायमध्ये हिंसाचार झाला असता. परंतु प्रशासन आरोपींना वाचवत असून सरकारच्या इशाऱ्यावरून हिंदुंवरच गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोप गिरिराज यांनी केला आहे. सध्याच्या स्थितीवर गांभीर्याने लक्ष दिलं नाही तर त्याचे विपरित परिणाम येत्या १० ते २० वर्षात पाहायला मिळणार असल्याचाही दावा गिरिराज यांनी केला आहे.
संबंधित बातम्या