भाजपच्या एका नगरसेवकाची त्यांच्याच मित्रांनी बेदम मारहाण करून हत्या केली. मध्य प्रदेशात ग्वाल्हेर जिल्ह्यातील मुरार पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. धक्कादायक म्हणजे हल्लेखोरांनी या घटनेचा व्हिडीओसुद्धा शूट केला आहे. ग्वाल्हेरमध्ये वॉर्ड नंबर तीनमधून शैलेंद्र कुशवाह नगरसेवक होते. त्यांच्या हत्येनंतर कुटुंबियांसह नातेवाईकांना आंदोलन केलं. शैलेंद्र कुशवाह हे राज्यमंत्री भर सिंह कुशवाह यांचे नातेवाईक आणि केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांचे निकटवर्तीय होते.
सुरुवातीच्या तपासात अशी माहिती समोर आली की, केक कापल्यानंतर पाच मित्रांनी दारु पिण्यास सुरुवात केली. दारु प्यायल्यानंतर नशेत त्यांचा शैलेंद्र कुशवाह यांच्याशी वाद झाला. त्यानंतर चौघांनी मिळून काठीने त्यांना मारहाण केली. रस्त्याच्या बाजूला बेदम मारहाण करत असताना त्याचा व्हिडीओ शूट करण्यात आला. तसंच तो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. पोलीस अधीक्षक अमित सांघी यांनी सांगितले की, शैलेंद्र कुशवाह यांना विक्की राणाच्या वाढदिवसाच्या पार्टीला बोलावण्यात आलं होतं. त्यांचे चार मित्र राजेश शर्मा, भूरा उर्फ सर्वेश तोमर, विनीत राजावत आणि धीरज पाल हेसुद्धा उपस्थित होते.
घटनेची माहिती मिळताच शैलेंद्र कुशवाह यांचे नातेवाईक घटनास्थळी पोहोचले. त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र गंभीर जखमी झालेल्या नगरसेवक कुशवाह यांचा उपचारावेळी मृत्यू झाला. गुरुवारी कुटुंबातील सदस्य आणि समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर या घटनेचा निषेध व्यक्त करत आंदोलन केलं. मृताच्या कुटुंबियांना आर्थिक मदत आणि आरोपींचे घरे पाडम्याची मागणी त्यांनी केली. आरोपी विक्की राणाला अटक करण्यात आली असून कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.