Kangana Ranaut News: बॉलीवूड अभिनेत्री आणि हिमाचलच्या मंडी मतदारसंघातील भाजप खासदार कंगना रणौत पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आल्या आहेत. ‘केंद्र सरकारने रद्द केलेले कृषी कायदे पुन्हा लागू करण्यात यावे, या कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी शेतकऱ्यांनीच करावी’, असे त्यांनी म्हटले आहे. कंगना यांच्या या वक्तव्यावर शेतकरी संघटनांसह विरोधकांनी टीका केली आहे.
कृषी कायद्याबाबत कंगना रणौत यांनी केलेले वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. परंतु, कंगना यांच्या वक्तव्याचे भाजप समर्थन करत नाही. हे त्यांचे वैयक्तिक विधान आहे, असे भाजप नेते असे गौरव भाटिया यांनी म्हटले. त्यानंतर कंगना यांनीही हे त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्ट केले.
कंगना रणौत म्हणाल्या होत्या की, 'मला माहित आहे की हे विधान वादग्रस्त असू शकते, परंतु तीन कृषी कायदे परत आणले पाहिजेत. शेतकऱ्यांनी स्वत: याची मागणी करावी.'
पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष अमरिंदर सिंह राजा यांनी अभिनेत्रीवर टीका केली. ‘मला वाटते की त्या मानसिकदृष्ट्या अस्थिर आहेत. काही लोकांना वाद निर्माण करण्याची सवय आहे आणि त्यांच्या वक्तव्याचा फायदा भाजपला होतो. त्या शेतकरी, पंजाब, आणीबाणी आणि राहुल गांधी यांच्याबद्दल बोलतात. इतर ही खासदार आहेत जे असे वक्तव्य कधीच करत नाहीत,’ असे काँग्रेस नेते म्हणाले.
काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनीही कंगनाचा व्हिडिओ शेअर करत तिन्ही कृषी कायदे परत आणले पाहिजेत, असे म्हटले आहे. तीन काळ्या शेतकरी कायद्यांविरोधात आंदोलन करताना ७५० हून अधिक शेतकरी हुतात्मा झाले. त्यांना परत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आम्ही तसे कधीही होऊ देणार नाही. हरियाणा आधी उत्तर देईल
काँग्रेसचे मीडिया आणि प्रचार विभागाचे प्रमुख पवन खेरा यांनीही एक्सवर हा व्हिडिओ शेअर केला आणि हा भाजपचा खरा विचार असल्याचे म्हटले आहे. ‘तुम्ही किती वेळा शेतकऱ्यांना फसवणार आहात, तुम्ही दोन तोंडाचे लोक?' पवन खेरा यांनी हिंदीतील एका पोस्टमध्ये म्हटले आहे.’
कंगना रणौतच्या वक्तव्यापासून भाजपने स्वत:ला दूर ठेवण्याची ही पहिलीच वेळ नसून पक्षाच्या वतीने अशी विधाने करण्याचा अधिकार कंगनाला नसल्याचे म्हटले आहे. तसेच भविष्यात अशी विधाने करणे टाळावे, असेही सांगितले होते.