Why Bismita Gogoi left Congress Party : काँग्रेसमधून बाहेर पडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या माजी आमदार बिस्मिती गोगोई यांनी काँग्रेसच्या नेत्यांवर अत्यंत गंभीर आरोप केला आहे. 'माझ्या ब्लाउज'वरील कमळाच्या चित्रावरून मला हिणवलं जायचं,' असं त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेसमध्ये महिलांना अजिबात मानसन्मान मिळत नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सध्या देशात सुरू आहे. मणिपूर ते मुंबई असा या यात्रेचा प्रवास आहे. मणिपूरमध्ये सुरुवात केल्यानंतर न्याय यात्रेनं आसाममध्ये प्रवेश केला होता. आसाममध्ये न्याय यात्रेला अनेक ठिकाणी विरोध झाला. मात्र, राहुल यांनी यात्रा पूर्ण करून आता पश्चिम बंगालमध्ये प्रवेश केला आहे.
न्याय यात्रा आसाममधून बाहेर पडताच काँग्रेस आणि ऑल आसाम स्टुडंट्स युनियनच्या (AASU) दीडशेहून अधिक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यात माजी आमदार बिस्मिता गोगोई यांचाही समावेश आहे. काँग्रेस सोडण्याचं कारण सांगताना त्यांनी ब्लाउजचा प्रसंग सांगितला.
'भारत जोडो यात्रेच्या दरम्यान मी साडी परिधान केली होती. त्यावेळी मी घातलेल्या ब्लाउजवर कमळाचं फूल होतं. मी कधी त्याकडं बारकाईनं पाहिलं नव्हतं. ब्लाउजवर काय चित्र आहे हे माझ्या कधी ध्यानीमनीही नव्हतं. मात्र, त्यावरून मला अनेकदा हिणवण्यात आलं. हिनं कमळाचा ब्लाउज घातलाय म्हणजे तिचा भाजपमध्ये जाण्याचा इरादा आहे, असं पसरवण्यात आलं.
राजीव भवन कार्यालयातही यावर चर्चा केली गेली. राज्य पातळीवरील नेत्यानं याबाबत विधान केलं होतं. या प्रसंगामुळं मला खूप धक्का बसला. मला अक्षरश: रडावंसं वाटलं. त्या घटनेनं मी दुखावले. माझा स्वाभिमान दुखावला गेला होता. पक्षात महिलांच्या विरोधात असं वातावरण असेल तर कोण तिथं राहील, असा सवाल त्यांनी केला. 'प्रत्येक पावलावर माझा मानसिक छळ झाला. माझ्यावर कोणतीही जबाबदारी दिली जात नव्हती. मला अनेक मोठ्या चर्चेपासून दूर ठेवण्यात आलं होतं, असं गोगोई यांनी सांगितल्याचं इंडिया टूडे नॉर्थ ईस्टच्या वृत्तात म्हटलं आहे.
काँग्रेसमध्ये महिला सुरक्षित नसल्याचा आरोप बिस्मिता यांनी केला आहे. ब्लाउजवर चर्चा करण्याइतका काँग्रेसचा स्तर घसरला आहे. ज्याच्यावर मोठी जबाबदारी आहे अशा एका नेत्यानं माझ्याबद्दल टिप्पणी केली होती, पण मी त्याचं नाव घेणार नाही, असं बिस्मिता म्हणाल्याचं वृत्त न्यू इंडियन एक्सप्रेसनं दिलं आहे.
संबंधित बातम्या