अब्जावधी वर्षांपूर्वी मंगळावर होता महासागर! खडकांचे विश्लेषण करत चीनी रोव्हरचा धक्कादायक शोध
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  अब्जावधी वर्षांपूर्वी मंगळावर होता महासागर! खडकांचे विश्लेषण करत चीनी रोव्हरचा धक्कादायक शोध

अब्जावधी वर्षांपूर्वी मंगळावर होता महासागर! खडकांचे विश्लेषण करत चीनी रोव्हरचा धक्कादायक शोध

Nov 08, 2024 06:49 AM IST

ocean on mars : चीनच्या रोव्हरने मंगळाच्या उत्तर गोलार्धात असलेल्या युटोपिया प्लॅनिशिया नावाच्या ठिकाणी मंगळाच्या पृष्ठभागावरील खडकांचे विश्लेषण करत या ठिकाणी अब्जावधी वर्षांआधी महासागर असल्याचा शोध लावला आहे.

अब्जावधी वर्षांपूर्वी मंगळावर होता महासागर! खडकांचे विश्लेषण करत चीनी रोव्हरचा धक्कादायक शोध
अब्जावधी वर्षांपूर्वी मंगळावर होता महासागर! खडकांचे विश्लेषण करत चीनी रोव्हरचा धक्कादायक शोध

ocean on mars : अब्जावधी वर्षांपूर्वी मंगळावर एक महासागर असल्याचा शोध चीनी रोव्हरने लावला आहे.  आजचा मंगळ आजच्या कोरड्या आणि उजाड ग्रहापेक्षा आधी खूप वेगळा असल्याचे पुरावे शास्त्रज्ञांना सापडले आहेत. गुरुवारी चीनी शास्त्रज्ञांनी सांगितलं की, झुरोंग रोव्हरने मंगळाच्या उत्तर भागात उतरून २०२१ मध्ये आपल्या शोध मोहिमेला सुरुवात केली होती. मंगल ग्रहावरील प्राचीन समुद्राची माहिती देणारे अनेक  भूवैज्ञानिक पुरावे या ठिकाणी सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. रोव्हरने मंगळाच्या उत्तर गोलार्धात असलेल्या युटोपिया प्लॅनिशिया नावाच्या ठिकाणी असलेल्या  पृष्ठभागावरील खडकांचे विश्लेषण केले. त्यात ही माहिती उघड झाली आहे. 

चीनची तियानवेन-१ ऑर्बिटर, नासाचे मार्स रिकॉनिसेन्स ऑर्बिटर आणि झुरोंग यांसारख्या रोबोटिक उपकरणांनी गोळा केलेल्या आकडेवारीनुसार मंगळावर एकेकाळी एक महासागर अस्तित्वात होता. मंगळग्रहावरील वातावरण हळूहळू थंड झाले. तर कालांतराने येथील वातावरण कोरडे होऊन नष्ट झाल्याचा दावा करण्यात आला आहे.  संशोधकांच्या म्हणण्यानुसार, ग्रहाच्या पृष्ठभागावर तयार झालेल्या रचना, जसे की खळगे, पाण्याच्या वाहिन्या व ज्वालामुखीची निर्मिती, मंगळावर किनारपट्टी असल्याचं दर्शवतात. मंगळावर  काही ठिकाणी उथळ तर काही ठिकाणी  खोल महासागर असल्याचे चिन्ह देखील आढळली आहे.

हाँगकाँग पॉलिटेक्निक युनिव्हर्सिटीतील ग्रहशास्त्रज्ञ बो वू हे या अभ्यासाचे प्रमुख लेखक आहेत. "मंगळाच्या युटोपिया प्लॅनिशियावर समुद्राचा उदय हा  सुमारे ३.६८ अब्ज वर्षांपूर्वी झाला असा आमचा अंदाज आहे. त्यावेळी भूगर्भीय अर्थाने समुद्राचा पृष्ठभाग कदाचित थोड्या काळासाठी गोठला असावा असा दावा देखील संशोधकांनी केला आहे. संशोधकांचं म्हणणं आहे की, सुमारे ३.४२ अब्ज वर्षांपूर्वी हा महासागर काही भुगर्भिय कारणांनी नष्ट झाला असावा.  हाँगकाँग पॉलिटेक्निक युनिव्हर्सिटीचे ग्रहशास्त्रज्ञ सर्गेई क्रासिलनिकोव्ह यांनी सांगितलं की, "मंगळावर असलेल्या महासागराच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात गाळ होता, ज्यामुळे साठ्याची स्तरीय रचना तयार झाली.  

पृथ्वी आणि सूर्यमालेतील इतर ग्रहांप्रमाणेच मंगळाची निर्मिती सुमारे ४.५ अब्ज वर्षांपूर्वी झाली होती. ज्या वेळी या ग्रहावर महासागर होता. मात्र, या ग्रहाचे वातावरण हळू हळू बदलत कोरडे होत होते. वू म्हणाले की, मंगळावरील प्राचीन महासागरांच्या अस्तित्वाचा अनेक दशकांपासून अभ्यास केला जात आहे, तरीही अनेक प्रश्न कायम आहेत. या शोधांमुळे मंगळावरील सागरी सिद्धांताला बळकटी तर मिळतेच, शिवाय त्याच्या संभाव्य उत्क्रांतीवरही चर्चा सुरू झाली आहे.

 शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की पाणी हा जीवनासाठी एक महत्त्वाचा घटक आहे.  मंगळावारील  प्राचीन महासागरांच्या उपस्थितीमुळे या ठिकाणी सूक्ष्मजीवांची भरभराट झाली असावी. क्रासिलनिकोव्ह म्हणाले, "मंगळाच्या इतिहासाच्या सुरुवातीच्या काळात, जेव्हा त्याचे वातावरण दाट व उष्ण होते, तेव्हा सूक्ष्मजीवांच्या जगण्याची शक्यता जास्त होती.

पौराणिक चिनी अग्नी देवतेचे नाव असलेले सौरऊर्जेवर चालणारे झुरोंग रोव्हर मे २०२१ मध्ये  सहा वैज्ञानिक शोध उपकरणांचा मंगळावर उतरवण्यात आले होते. हे रोव्हर मे २०२२ मध्ये हायबरनेशन मोडमध्ये गेले. तीन महिन्यांच्या नियोजित मोहिमेच्या वेळेपेक्षा अधिक वेळ शोध मोहीम  राबवल्यावर ते  निष्क्रिय झाले. मंगळावर पाणी अजूनही जमिनीत खोलवर असण्याची शक्यता आहे का हे समजून घेण्यासाठी संशोधक मंगळाच्या पृष्ठभागावरील खडकांचा पाण्याचा अभ्यास करत आहेत. नासाच्या इनसाइट लँडरने मिळवलेल्या भूकंपीय डेटाचा वापर करून ऑगस्टमध्ये प्रकाशित झालेल्या आणखी एका अभ्यासानुसार, मंगळाच्या पृष्ठभागाखाली  खडकांमध्ये मोठा जलाशय असू शकतो, असा दावा करण्यात आला आहे. 

Whats_app_banner
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर