मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  आफ्रिकेच्या राष्ट्रपतींना खिशात घालून अब्जावधी लाटले; यूपीतील गुप्ता बंधुना अटक

आफ्रिकेच्या राष्ट्रपतींना खिशात घालून अब्जावधी लाटले; यूपीतील गुप्ता बंधुना अटक

HT Marathi Desk HT Marathi
Jun 07, 2022 05:13 PM IST

मूळचे उत्तर प्रदेशचे असलेले आणि सध्या दक्षिण आफ्रिकेत स्थायिक झालेले उद्योगपती राजेश आणि अतुल गुप्ता या बंधुना दुबईत अटक करण्यात आली आहे.

Gupta Brothers arrested in DUbai
Gupta Brothers arrested in DUbai

मूळचे उत्तर प्रदेशचे असलेले आणि सध्या दक्षिण आफ्रिकेत स्थायिक झालेले उद्योगपती राजेश गुप्ता आणि अतुल गुप्ता या दोघा भावांना दक्षिण आफ्रिकेच्या पोलिसांनी संयुक्त अरब आमिराती येथे सोमवारी रात्री अटक केली आहे. (Gupta brothers arrested in Dubai) दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्रपती जेकब झुमा यांच्या ओळखीचा फायदा घेऊन अब्जावधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा या गुप्ता बंधुवर आरोप ठेवण्यात आला आहे. या दोघा भावांनी मात्र आपल्यावरील आरोपांचा इन्कार केला आहे.

गुप्ता बंधुना भ्रष्टाचार, फसवणूक करणे आणि सरकारी पैशांची अफरातर करणे या आरोपांखाली नुकतीच अटक करण्यात आली आहे. फरार असलेल्या गुप्ता बंधुना शोधण्यासाठी इंटरपोलने नोटिस जारी केली होती. दक्षिण आफ्रिकेत सरकारी नियुक्त्यांमध्ये हस्तक्षेप करणे, गैरमार्गाने सरकारी कॉंट्रॅक्ट मिळवणे, गैरमार्गाने सरकारचा निधी प्राप्त करणे आणि देशाच्या मालमत्तेचा गैरवापर करणे यासारखे आरोप गुप्ता बंधुवर लावण्यात आले आहे.

जेकब झुमा हे २००९ ते २०१८ दरम्यान दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली त्यांना पदावरून दूर व्हावे लागले होते. झुमा यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी न्यायालयीन आयोग नेमला गेला होता. भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये गुप्ता बंधुच्या सहभागाची चौकशी सुरू होताच २०१८ साली त्यांनी दक्षिण आफ्रिकेतून पलायन करून दुबई गाठले होते.

गुप्ता बंधुच्या प्रत्यार्पणासाठी दक्षिण आफ्रिका सरकारने यूएई सरकारसोबत चर्चा करून २०२१ साली एक करार केला असल्याचे दक्षिण आफ्रिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. देशातून फरार झालेले राजेश गुप्ता आणि अतुल गुप्ता या दोघांना यूएई पोलिसांनी नुकतीच अटक केली असल्याचे दक्षिण आफ्रिकेच्या न्याय आणि सुधार सेवा विभागाद्वारे जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. पुढील कारवाईसाठी यूएई आणि दक्षिण आफ्रिकेच्या पोलीस दलात चर्चा सुरू असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.

दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्रपती जेकब झुमा यांचे कुटुंबीय आणि गुप्ता कुटुंबियांदरम्यानच्या घनिष्ट संबंधामुळे त्यांना दक्षिण आफ्रिकेत गमतीने ‘झुप्टा’ म्हणून संबोधले जायचे. झुमा यांची एक पत्नी, मुलगा आणि मुलगी गुप्ता यांच्या मालकीच्या कंपन्यांमध्ये मोठ्या पदावर नेमण्यात आले होते. गुप्ता बंधुनी दक्षिण आफ्रिकेत भ्रष्टाचाराच्या मार्गाने मिळवलेला पैसा मनी लॉंड्रिंगच्या माध्यमातून भारतात आणून विविध व्यवसायात गुंतवल्याचा संशय आहे. २०१८ साली भारतातील विविध शहरांतील त्यांचे निवासस्थान तसेच दिल्लीस्थित कंपनीच्या मुख्यालयावर छापे पडले होते.

अजय, अतुल आणि राजेश गुप्ता हे तिघे भाऊ १९९३ साली उत्तर प्रदेशातून दक्षिण आफ्रिकेला स्थलांतरित झाले होते. सहारा कम्प्युटर्स नावाने त्यांनी तेथे आपला व्यवसाय सुरू केला होता. दक्षिण आफ्रिकेत त्यांच्या कंपनीत एकूण १० हजार कर्मचारी काम करतात. दक्षिण आफ्रिकेत खाण व्यवसाय, हवाई कार्गो सेवा, ऊर्जा निर्मिती, तंत्रज्ञान आणि माध्यम क्षेत्रात गुप्ता बंधुनी अब्जावधींची गुंतवणूक केली असल्याचे चौकशी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

IPL_Entry_Point

विभाग