मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. आपल्या दौऱ्यात ते भारताच्या विविध भागात जाऊन लोकांना भेटत आहेत. त्यांच्या दौऱ्याचे फोटो व व्हिडिओ लोकांचे लक्ष आकर्षित करत आहेत. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीमधील एक असलेल्याबिल गेट्स यांचा ताजा व्हिडिओ एका चहाच्या गाड्यावरील आहे.
सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओत बिल गेट्स यांना भारतातील एका प्रसिद्ध चहा स्टॉलसमोर एक कप चहाचा स्वाद घेताना पाहिले जाऊ शकते. या व्हिडिओमध्ये बिल गेट्स यांना प्रसिद्ध चहा विक्रेता आणि सोशल मीडियावर सक्रीय व्यक्ती डॉली चहावाल्यासोबत संवाद साधताना दिसत आहेत. त्याचबरोबर ते डॉलीने बनवलेल्या चहाचा आनंद घत असल्याचे दिसत आहे.
व्हिडिओच्या सुरुवातील बिल गेट्स चहावाल्या डॉलीला म्हणतात की, एक चहा द्या प्लीज, त्यानंतर चहावाला टी स्टॉलमध्ये आपल्या सिग्नेचर स्टाइलने चहा तयार करतो. व्हिडिओच्या शेवटी गेट्स यांना एका ग्लासमधून वाफाळलेल्या चहाचा आनंद घेताना दाखवले आहे.
नागपूर शहरातील सदर परिसरात जुन्या व्हीसीए स्टेडियमजवळ रस्त्याकिनारी चहाचा स्टॉल आहे. चहा विक्रेत्याचे खरे नाव माहित नाही, मात्र सोशल मीडियावर तो डॉली चहावाला नावाने लोकप्रिय आहे. यापूर्वी बिल गेट्स यांनी कंपनीच्या हैदराबाद येथील भारत विकास केंद्र (आयडीसी) चा दौरा करून आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) बाबत चर्चा केली होती.
बिल गेट्स यांनी बुधवारी सकाळी भुवनेश्वरमधील एका झोपडपट्टीचा दौरा करत तेथील लोकांशी संवाद साधला होता.