मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Bilkis Bano Case: 'त्या' ११ दोषींवर पोलीसांची करडी नजर; आत्मसमर्पणाची तयारी सुरू

Bilkis Bano Case: 'त्या' ११ दोषींवर पोलीसांची करडी नजर; आत्मसमर्पणाची तयारी सुरू

Haaris Rahim Shaikh HT Marathi
Jan 09, 2024 01:22 PM IST

बिल्किस बानो बलात्कार प्रकरणातील शिक्षा ठोठावण्यात आलेले आणि सध्या सोडण्यात आलेले सर्व ११ आरोपी सध्या कुठे राहतात याची आम्हाला माहिती असल्याचं पोलिसांनी सांगितले. बहुतेक सर्व आरोपी घरीच असून त्यांच्यावर पोलीस बारकाईने लक्ष ठेवून आहे.

A protest rally in support of Bilkis Bano in Kolkata in August 2022. (AFP/File)
A protest rally in support of Bilkis Bano in Kolkata in August 2022. (AFP/File)

२००२ च्या गुजरात येथील भीषण जातीय दंगलीदरम्यान बिल्किस बानो या महिलेवर सामूहिक बलात्कार आणि तिच्या सात नातेवाईकांची हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या ११ जणांवर बारीक लक्ष ठेवून असल्याची माहिती गुजरात पोलिसांनी दिली. सध्या हे सर्व आरोपी गुजरातच्या दाहोद जिल्ह्यातील सिंगवाड गावात राहत आहेत. या सर्व ११ आरोपींना दोन आठवड्याच्या आत पुन्हा कारागृहात बंद करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने काल, सोमवारी दिले होते.

याबाबत गुजरातच्या दाहोद जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बलराम मीणा यांनी अधिक माहिती दिली. सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या एक दिवस आधी दाहोदमधील सिंगवाड गावात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गावातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांनी आवश्यक ती सर्व पावले उचलली असून हे सर्व अकराही आरोपी कुठे राहतात याची आम्हाला माहिती असल्याचं मीणा यांनी सांगितले. बहुतेक सर्व आरोपी घरीच असून त्यांच्यापैकी काही जण घरगुती कार्यक्रमासाठी बाहेरगावी गेले आहेत. त्यांच्यावर सुद्धा पोलीस बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे मीणा यांनी सांगितले. 

दरम्यान, पोलिस सर्व आरोपींशी फोनवरून संपर्कात असून आरोपी ‘नॉट रिचेबल’ झाले असल्याच्या वृत्तांचे त्यांनी खंडन केले. दोषींना दोन आठवड्याच्या आत पोलिसांपुढं शरण येण्याचे आदेश देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या प्रतीक्षेत ही पोलीस व्यवस्था करण्यात आल्याचे मीणा यांनी सांगितले.

बिल्किस बानो यांनी नोव्हेंबर २०२२ मध्ये सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. बलात्काराचा आरोप सिद्ध झालेल्या या अकरा दोषींच्या सुटकेमुळे समाजाची विवेकबुद्धी हादरली असून लाखो लोकांनी माझ्याप्रती सहानुभूती व्यक्त केली नसती तर माझ्याकडे धैर्य उरलंच नसतं असं आपल्या याचिकेत म्हटलं होतं.

सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या आदल्या दिवशी सुरक्षेच्या कारणास्तव बिल्किस बानो यांनी त्यांचं मूळ गाव असलेल्या रणधिकपूर येथून आपल्या कुटुंबासह दुसरीकडे स्थलांतर केलं होतं. हजारो सर्वसामान्य नागरिक आणि महिला बानो यांच्या पाठीशी उभे राहिले होते. देशभरातून ६००० आणि मुंबईतून ८,५०० लोकांनी बिल्कीस बानोच्या बलात्काऱ्यांना सोडू नये असं सरकारला आवाहन केलं होतं. कर्नाटकातील २९ जिल्ह्यांतील ४०,००० नागरिकांनी खुलं पत्र लिहून आवाहन केलं होतं. या सर्वांनी दाखवलेली एकजुट आणि सामर्थ्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते, असं बिल्किस बानो यांनी सांगितलं.

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, गुजरात सरकार कैद्यांशी संगनमत करीत आहे आणि माफी रद्द करताना त्यांची अकाली सुटका करण्याचे आदेश देण्यासाठी आपल्या अधिकाराचा चुकीचा वापर केला आहे. ज्या महाराष्ट्रात दोषींवर खटला चालवण्यात आला, त्या महाराष्ट्राची सत्ता गुजरातने हिरावून घेतली.

२००२ साली गुजरात दंगलीदरम्यान तीन महिन्यांची गरोदर असलेल्या बिल्किस बानोवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. या दंगलीत बिल्किस बानोच्या तीन वर्षांच्या मुलीसह सात नातेवाईक ठार झाले होते.

 

WhatsApp channel