मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  दुर्दैवी..! महामार्गावरील वाहतूक कोंडीने घेतला नवजात बाळाचा बळी, आई-वडिलांच्या डोळ्यादेखत सोडला जीव

दुर्दैवी..! महामार्गावरील वाहतूक कोंडीने घेतला नवजात बाळाचा बळी, आई-वडिलांच्या डोळ्यादेखत सोडला जीव

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 10, 2024 11:15 PM IST

Traffic Jam : मोटारसायकलवर सवार दाम्पत्य वाहतूक कोंडीत अडकले. ते एक महिन्याच्या आजारी बाळाला घेऊन रुग्णालयात जात होते. खूप वेळ ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतर त्याने आईच्या मांडीवरच जीव सोडला.

महामार्गावरील वाहतूक कोंडीने घेतला नवजात बाळाचा बळी
महामार्गावरील वाहतूक कोंडीने घेतला नवजात बाळाचा बळी

उत्तर प्रदेशमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. हमीरपूर जिल्ह्यातील कानपूर-सागर राष्ट्रीय महामार्गावर दररोज असणाऱ्या वाहतूक कोंडीने एक निष्पाप जीवाचा बळी घेतला आहे. रविवारी दुपारी महामार्गावर झालेल्या वाहतूक कोंडीत मोटारसायकलवर सवार दाम्पत्य अडकले. ते एक महिन्याच्या आजारी बाळाला घेऊन रुग्णालयात जात होते. खूप वेळ ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतर त्याने आईच्या मांडीवरच जीव सोडला. 

मूसानगर येथे राहणाऱे दाम्पत्य बाळाला घेऊन हमीरपूरला जात होते. बाळाच्या मृत्यूनंतर दाम्पत्य मृतदेह घेऊन यमुना नदी पुलावरून परत मूसानगरला गेले. कानपूर-सागर महामार्गावर मागील अनेक दिवसांपासून तासनतास ट्रॅफिक जाम लागत आहे. यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. शनिवारी पुन्हा या मार्गावर ट्रॅफिस जाम झाले व २४ तासांनंतरही मार्ग खुला झाला नाही. यामुळे कोवळ्या जीवाचा बळी गेला.

रविवारी मूसानगरमधील किसवा दुरौली गावातील निवासी अनीता आपला पती संदेशसोबत बाईकवरून आजारी आध्या याला हमीरपूर येथील रुग्णालयात नेत होती. मात्र ते ट्रॅफिक जाममध्ये अडकले. जाम इतका भीषण होता की, बाइक, सायकलही पुढे जात नव्हती. 

पोलिसांनी वाहतूक सुरुळित करण्याचा तसेच दाम्पत्याला मदत करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही. अनेक तास ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतर बाळाची प्रकृती बिघडली आणि वेळेवर उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला. बाळाच्या मृत्यू झाल्यानंतर त्याच्या आईचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

WhatsApp channel