Viral news : कर्नाटकातील म्हैसूरमध्ये एका बाइक मेकॅनिकची प्रतीक्षा फळाला आली आहे. एक दिवस आपले नशीब पालटेल या विश्वासानं गेल्या १५ वर्षांपासून तो लॉटरीची तिकिटं विकत घेत होता. नेहमीप्रमाणे यावर्षीही त्यानं लॉटरीचं तिकीट विकत घेतलं आणि रातोरात करोडपती झाला. त्यानं २५ कोटींची लॉटरी जिंकली आहे.
अल्ताफ पाशा, असे लॉटरी जिंकणाऱ्या बाइक मॅकेनिकचं नाव आहे. त्यानं सांगितलं की, त्याने त्याच्या मित्राला दोन तिकिटे विकत घेण्यास सांगितले होते. परंतु,दोघांनी ही तिकिटं अदलाबदल केली. सुदैवाने अल्ताफ पाशाकडे जे तिकीट होतं त्या टिकीटामुळे त्याला मोठा जॅकपॉट लागला. त्याला तब्बल २५ कोटी रुपयाची लॉटरी लागली. त्याला लॉटरी लागून तो कोट्यधीश झाल्यावर त्याचा अजूनही विश्वास बसत नसल्याचे अल्ताफ पाशाने सांगितले. या पैशांतून आपल्या मुलीला डॉक्टर बनवून स्वत:चे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करणार असल्याचे त्याने सांगितले.
अल्ताफ पाशा हा म्हैसूरजवळील एका छोट्याशा गावात त्यांचे बाइक मेकॅनिकचं दुकान चालवतो. लॉटरी जिंकल्यानंतर त्याने सांगितले की, गेल्या १५ वर्षांपासून तो लॉटरीची तिकिटे विकत घेत होता. नेहमीप्रमाणे यंदाही केरळच्या तिरुवोनम बंपर लॉटरीची घोषणा झाली तेव्हा त्याने त्याच्या एका मित्राला प्रत्येकी ५०० रुपयांची दोन तिकिटे विकत घेण्यास सांगितले. अल्ताफने आपल्या मित्राला तिकीट देण्याचे ठरवले होते, पण त्याच्या पत्नीने त्याला तसे करण्यापासून रोखले. याच तिकिटावर त्याला २५ कोटी रुपयांचे बंपर बक्षीस मिळाले.
अल्ताफने सांगितले की, त्याच्या १८ वर्षीय तनाज फातिमा या मुलीला डॉक्टर व्हायचे आहे. जॅकपॉट जिंकल्यानंतर अल्ताफ पाशा खुश असून त्याला त्याच्या मुलीचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. सध्या अल्ताफ पाशा हा भाड्याच्या घरात राहतो. त्याला त्याचे घर घेण्याचे स्वप्न देखील पूर्ण करायचे आहे. तिरुवोनम बंपर लॉटरीची सोडत बुधवारी काढण्यात आली, ज्यात अल्ताफने २५ कोटी रुपयांची लॉटरी जिंकली. यामुळे त्याचं नशीब बदललं.