बिहारमध्ये नेहमीच शिक्षणावरून प्रश्न उपस्थित केला जातो. अनेकदा तिथल्या शिक्षण व्यवस्थेतला भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणणारे व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण आता एक असा व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यात शिक्षिका मुलांना हसत खेळत शिकवत आहे. वर्गात मुलांना कंटाळा येऊ नये यासाठी शिक्षक वेगवेगळ्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. असंच बांकामधील एका शिक्षेकेनं केलं आहे.
बांका जिल्ह्यातील कटोरियातल्या पोन्नत मध्य विद्यालयातला हा व्हिडीओ आहे. या शाळेतील शिक्षिका खुशबू कुमारी मुलांना अनोख्या पद्धतीने शिकवतात. त्या विद्यार्थ्यांसोबत मिळून गाण्यांवर डान्स करत असलेला व्हिडीओ व्हायरल होतोय. सोशल मीडिया युजर्सनी त्यांच्या या शिकवण्याच्या पद्धतीचे कौतुक केले आहे.
कटोरियातल्या राणा नगरच्या असलेल्या शिक्षिका खुशबू कुमामरी यांचे पतीसुद्धा शिक्षक आहेत. खुशबु कुमारी यांनी सांगितले की, मी गेल्या दहा वर्षांपासून मुलांना शिकवते. सुरुवातीपासूनच हसत खेळत शिकवण्यावर माझा भर आहे. सुरुवातीला मी कधी फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत नव्हते. पण अलिकडे काही व्हिडीओ शेअर करायला सुरू केले असल्याचंही त्यांनी सांगितलं.
आनंदी राहणं आणि लोकांनाही आनंदी ठेवणं हा माझा स्वभाव आहे. प्रत्येक मुलात मला माझ्याच मुलाचा चेहरा दिसतो. वर्गात कुणी कंटाळून जाऊ नये याकडे कटाक्षाने लक्ष असतं असंही खुशबु कुमारी यांनी सांगितलं. शाळेच्या प्राचार्या तुलसी दास म्हणाल्या की, मुलांना इथे मनोरंजक पद्धतीने शिक्षण दिलं जातं. यामुळे मुलेही दररोज शाळेत येत आहेत.