बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बिहारच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून नव्या राजकीय पक्षाची एन्ट्री झाली आहे. राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी जन सुराज पक्षाच्या स्थापनेची घोषणा केली आहे. तसेच त्यांनी पक्षाच्या पहिल्या नेत्याचे नावही जाहीर केले आहे. त्यांचा पक्ष बिहारमध्ये नितीश कुमार व लालू प्रसाद यादव यांना टक्कर देणार आहे.
प्रशांत किशोर यांच्या टीमचं नाव जन सूराज पार्टी आणि मनोज भारती यांना जन सुराज पार्टीचे पहिले नेते बनवण्यात आलं आहे. प्रशांत किशोर यांनी मनोज भारती यांच्या नावाची पक्षाच्या कार्याध्यक्षपदी घोषणा केली आणि मार्चमध्ये निवडणुकांद्वारे नवीन अध्यक्षाची निवड केली जाईल, असे सांगितले. येत्या एक-दोन दिवसांत पक्षाची परिषद (लीडरशिप काउंसिल) स्थापन होऊन नाव जाहीर केले जाईल. प्रशांत किशोर यांच्या या घोषणेमुळे बिहारमध्ये एका नव्या पक्षाचा प्रवेश झाला आहे. प्रशांत किशोर यांनी पाटण्यातील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानावर ही घोषणा केली. पीके यांनी उपस्थित लोकांना विचारले की, नव्या पक्षाचे नाव चांगले जन सुराज आहे का?. लोकांनी त्याला पाठिंबा दिला. प्रशांत किशोर म्हणाले की, निवडणूक आयोगाने त्यांच्या नव्या पक्षाच्या नावाला मान्यता दिली आहे.
नव्या पक्षाच्या नावाची घोषणा झाल्यानंतर प्रशांत किशोर यांनी जय बिहारचा नारा दिला. तसेच विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. प्रशांत किशोर म्हणाले की, इतर सर्व राजकीय पक्षांनी बिहारच्या जनतेची फसवणूक केली असून आज बिहारच्या लोकांना नोकरीच्या शोधात राज्याबाहेर जावे लागत आहे. राज्यात सत्ता आल्यास बिहारमधील दारुबंदी हटवण्याची घोषणा प्रशांत किशोर यांनी केली आहे. त्यातून मिळणारा पैसा शिक्षण क्षेत्रात पायाभूत सुविधा आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी केला जाईल. मागील २५ते ३० वर्षे लोकांनी आरजेडी किंवा बीजेपीला मतदान केले. आता हा पर्याय कोणत्याही वारसा हक्काने आलेल्या पक्षाचा नाही. हा लोकांचा पक्ष आहे, असेही प्रशांत किशोर म्हणाले.
प्रशांत किशोर म्हणाले की, आमची मागणी आहे की येथे भूमिसुधारणा लागू करण्यात याव्यात, सर्वेक्षण नव्हे. नितीश सरकारला ती कोणाची जमीन आहे हे माहित नसताना ते कोणाची जमीन आहे, असा प्रश्न विचारत आहेत. प्रशांत किशोर म्हणाले की, यासाठी ५ वर्षे लागतील परंतु येथे जमीन सुधारणा पूर्णपणे लागू केली जाईल. बिहारमध्ये भूमिसुधारणां अभावी बिहारमधील १०० पैकी ६० लोक भूमिहीन आहेत.
तत्पूर्वी जनसुराज पक्षाच्या स्थापना कार्यक्रमात प्रार्थनेनंतर राज्यघटनेच्या प्रस्तावनेचे वाचन करण्यात आले. चंपारणयेथील निवृत्त शिक्षक गोरख महतो यांनी राज्यघटनेच्या प्रस्तावनेचे वाचन केले. प्रशांत किशोर यांनी २ ऑक्टोबर २०२२ पासून जनसुराज मोहिमेला सुरुवात केली होती. यावेळी त्यांनी संपूर्ण बिहारमध्ये पदयात्रा काढली.