Bihar Manager Kills laborer: बिहारमधील मधुबनी जिल्ह्यातून धक्कादायक घटना उघडकीस आली. ८०० रुपयांची थकबाकी मागितल्याने एका मजुराची हत्या करण्यात आली. झंझारपूरच्या बेलाराही भागात ही घटना घडली. मायक्रोफायनान्स कंपनीच्या मॅनेजरने मजूर झोताई मंडल ( वय, ५१) यांना तीन मजली इमारतीच्या छतावरून खाली फेकल्याचा आरोप आहे. यात मजुराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. झोताईंनी मॅनेजरकडे त्याच्या मेहनतीसाठी आणि हक्कासाठी ८०० रुपयांची मागणी केली होती. यामुळे संतापलेल्या मॅनेजरने छतावरून फेकून त्याची हत्या केली. हत्येनंतर झंझारपूर रुग्णालयात प्रचंड गर्दी जमली आणि आरोपीला कठोर शिक्षा व्हाणी, अशीही मागणी केली जात आहे.
एसएचओ रणजित कुमार यांनी सांगितले की, आरोपी मॅनेजर संतोष कुमारला अटक करण्यात आली आहे. अन्य तिघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. मृताची पत्नी रीता देवी यांच्या जबाबावरून मॅनेजरसह मायक्रोफायनान्स कंपनीतील नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, रीता देवी कंपनीच्या ऑफिसमधील निवासी घरात स्वयंपाकी म्हणून काम करतात. मॅनेजरने सहा दिवसांपूर्वी महिलेला कामावरून काढून टाकले होते. शुक्रवारी ती आजारी पती आणि मुलासह ८०० रुपयांची थकबाकी मागण्यासाठी आली होती. या प्रकरणी संतापलेल्या मॅनेजरने पती झोताई यांना तीन मजली इमारतीच्या छतावरून खाली फेकले.
अटक करण्यात आलेला मॅनेजर पूर्व चंपारण जिल्ह्यातील भगवानपूरमधील चैनपूर गावचा रहिवासी आहे. दुसरीकडे झंझारपूर उपविभागीय रुग्णालयात मजुराच्या मृत्यूची पुष्टी होताच मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी लोकप्रतिनिधींच्या मदतीने संतप्त जमावाला कसेबसे शांत करण्याचा प्रयत्न केला.
मृत झोताई यांच्या पत्नी रीता देवी रुग्णालयात रडू लागल्या. कुटुंबाच्या पालनपोषणाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आली आहे. रीता यांच्या मुलाचे आणि मुलीचे लग्न झाले आहे. तिसरी मुलगी काजल कुमारी ही आईसोबत घरकाम करते आणि शिक्षण घेते. रिता यांचे पती आजारी असल्याचे सांगण्यात येत आहे. आर्थिक अडचणींमुळे तिने मायक्रोफायनान्स कंपनीच्या मॅनेजरकडे स्वयंपाकी म्हणून काम करण्यास सुरुवात केली. महिलांना कर्ज देण्याचे आणि कर्जाचा हप्ता वेळेत न भरल्यास कंपनीने त्यांच्याशी गैरवर्तन केल्याचेही सांगितले जात आहे. रिताने कंपनीकडून कर्जही घेतले होते, त्यामुळे मॅनेजर तिला नेहमी शिवीगाळ करत असे.