मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  जिल्हाधिकाऱ्यांच्या भरधाव कारने ५ जणांना चिरडलं, ३ जणांचा मृत्यू; घटनेनंतर डीएम पसार

जिल्हाधिकाऱ्यांच्या भरधाव कारने ५ जणांना चिरडलं, ३ जणांचा मृत्यू; घटनेनंतर डीएम पसार

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Nov 21, 2023 02:27 PM IST

Car Accident : जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीने रस्त्याकडेला काम करत असलेल्या पाच मजुरांना चिरडले. यामध्ये एका महिलेसह तिघांचा मृत्यू झाला असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. ही घटना बिहारमधील मधेपुरा येथे घडली.

Car Accident
Car Accident

बिहारमध्ये  मधेपुरा जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनाने पाच लोकांना चिरडले आहे. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना फुलपरास पोलीस ठाणे क्षेत्रात घडली. जिल्हाधिकाऱ्यांची गाडी मधेपुराकडे जात असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व गाडीने रस्त्याकडेला काम करत असलेल्या पाच मजुरांना चिरडले. 

ट्रेंडिंग न्यूज

गाडीच्या धडकेत एक मजूर, महिला व मुलाचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान अपघातानंतर जिल्हाधिकारी व चाकल गाडी तेथेच सोडून पसार झाले. त्यानंतर संतप्त जमावाने कारची नासधूस केली. 

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, हा अपघात मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास झाला. अपघातानंतर डीएम आणि त्यांचा स्टाफ मोटारसायकलीवरून घटनास्थळावरून फरार झाला. त्यांनी सांगितले की, कारने आघी महिला व एका लहान मुलाल धडक दिली त्यानंतर एनएच-५७  वर काम करत असलेल्या कामगारांना धडक दिली. मजूर राजस्थानमधील आहेत. दोन जखमींना दरभंगा मेडिकल महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात एकूण तीन लोकांचा मृत्यू झाला आहे, त्यामध्ये गुरिया देवी (२७ वर्ष) आणि त्यांच्या ७ वर्षीय मुलीचा समावेश आहे. राजस्थानमधील अशोक सिंह यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

अपघातानंतर जमलेल्या जमावाने जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनावर दगडफेक करून नासधूस केली. त्याचबरोबर शेकडोच्या जमावाने एनएच-५७ वर रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांनी वाहनात असलेल्या लोकांच्या अटकेची मागणी केली. तसेच मृतांच्या वारसांना नुकसानभरपाई देण्याचीही मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला गेला मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. दरम्यान मधेपुरा जिल्हा जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले की, डीएम कार्यालयात आहेत.

WhatsApp channel

विभाग