IPS Shivdeep Lande Resign : बिहारमधील मराठमोळे डॅशिंग आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी आपल्या नोकरीचा तसेच भारतीय पोलीस सेवेचा राजीनामा दिला आहे. त्यांनी फेसबुक पोस्ट करत आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची घोषणा केली आहे. शिवदीप लांडे यांच्या राजीनाम्याने शासकीय वर्तुळात चर्चांना उधाण आहे. लांडे यांनी अचानक राजीनामा दिल्याने बिहार महाराष्ट्रासोबतच देशभर चर्चेचा विषय बनला आहे.
बिहारमधील दबंग पोलीस अधिकारी म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिवदीप लांडे यांनी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून राजीनामा दिल्याची घोषणा केल्यानेपोलीस दलात खळबळ उडाली आहे. दोन आठवड्यांपूर्वी लांडे यांनी पूर्णिया आयजी पदाची जबाबदारी स्वीकारली होती. यानंतर लगेचच त्यांनी नोकरीचा राजीनामा दिल्याने अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. तिरहुत सारख्या मोठ्या भागातून पूर्णियाला पाठवल्याने ते नाराज असल्याची चर्चा होती. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी लेडी सिंघम म्हणून प्रसिद्ध असलेल्या आयपीएस अधिकारी काम्या मिश्रा यांनीही वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिला होता. त्यानंतर लांडे यांनी राजीमाना दिल्याने पोलीस प्रशासनात खळबळ माजली आहे.
पोलीस महासंचालक कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना लांडे यांनी राजीनामा दिल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी म्हटले की, राजीनाम्याची बातमी खरी आहे. मी वैयक्तिक कारणांमुळे भारतीय पोलीस सेवेचा राजीनामा दिला आहे. शिवदीप लांडे महाराष्ट्रातील अकोल्याचे रहिवासी आहेत. त्यांना आयपीएस म्हणून बिहार केडर मिळाले आहे. त्यांनी तिरहुत विभाग ( मुझफ्फरपूर ) कोसी विभागाचे उपमहानिरीक्षक आणि बिहारमधील अररिया, पूर्णिया आणि मुंगेर जिल्ह्यांमध्ये पोलीस अधीक्षक म्हणून काम केले आहे. बिहारमधील डॅशिंग पोलीस अधिकारी म्हणून ते प्रसिद्ध आहेत.
राजीनाम्याची घोषणा त्यांनी सोशल मीडियाद्वारे केली असून त्यांनी म्हटले आहे की, गेली १८ वर्षे शासकीय पदावर काम केल्यानंतर आज मी या पदाचा राजीनामा दिला आहे. मी बिहारला माझ्या कुटुंबापेक्षा जास्त मानले आहे. माझ्या सेवेत काही चूक झाली असेल तर माफ करावे. मी यापुढे बिहारमध्येच राहणार असून बिहारच माझी कर्मभूमी असेल.
सद्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. निवडणुकीसाठी राजकीय मोर्चे बांधणी सुरू असतानाच शिवदीप लांडे यांनी राजीनामा दिल्याने ते निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू आहे आहे. मात्र लांडे यांनी आपली कर्मभूमी बिहार असून तेथेच राहणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या बिहार निवडणुकीत ते उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तुर्तास त्यांनी आपल्या भावी वाटचालीबाबत काहीच स्पष्ट केलेले नाही. अशीही चर्चा आहे की, शिवदीप लांडे प्रशांत किशोर यांच्या जन सुराज्य पदयात्रेनंतर २ ऑक्टोबर रोजी स्थापन होणाऱ्या पक्षात सामील होतील व पाटणा शहरातील एखाद्या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरतील.