Nitish Kumar : नितीश कुमार विश्वासदर्शक ठरावात ‘पास’; विरोधकांचा वॉकआऊट, सरकारच्या बाजुने १२९ मते
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Nitish Kumar : नितीश कुमार विश्वासदर्शक ठरावात ‘पास’; विरोधकांचा वॉकआऊट, सरकारच्या बाजुने १२९ मते

Nitish Kumar : नितीश कुमार विश्वासदर्शक ठरावात ‘पास’; विरोधकांचा वॉकआऊट, सरकारच्या बाजुने १२९ मते

Feb 12, 2024 05:33 PM IST

Bihar Floor Test : बिहारमधील नितीश कुमार सरकारने विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानाने जिंकला आहे. सरकारच्या बाजुने १२९ मते पडली तर विरोधात एकही मत पडले नाही.

Nitish Kumar
Nitish Kumar

नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील बिहार सरकारने आज विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. विश्वासदर्शक ठरावावेळी विरोधकांनी सभात्याग केल्याने हा ठराव आवाजी मतदानाने मंजूर झाला. मतदानात सरकारच्या बाजूने १२९ मते पडली, तर विरोधात एकही मत पडले नाही.

बिहर विधानसभेच्या २४३ जागांपैकी  बहुमतासाठी १२२ आमदारांचा पाठिंवा आवश्यक आहे.  एनडीएकडे १२८ विधानसभा सदस्य आहेत. यामध्ये भाजपला ७८ जागा, जेडीयूकडे ४५ जागा, हिंदुस्थानी अवाम मोर्चा ४ जागा आणि एक अपक्ष आमदार सुमित सिंह देखील आहेत. तर विरोधकांकडे ११४ आमदारांचे पाठबळ होते.

मात्र विश्वासदर्शक ठरावापूर्वीच मोठा राजकीय गोंधळ पाहायला मिळाला. राजदच्या तीन आमदारांनी कॅम्प बदलून सत्ताधारी गटात प्रवेश केला. यामध्ये चेतन आनंद, नीलम देवी आणि प्रल्हाद यादव यांचा समावेश आहे. राजद नेते तेजस्वी यादव यांनी याला विरोध करत त्यांना विरोधी बाकांवरच बसण्यास सांगितले. यावेळी भाजपचे तीन व जदयूचे तीन आमदारही सभागृहात अनुपस्थित होते.  मात्र जेडीयूचा एक आमदार वगळता अन्य आमदार दुपारी अडीचनंतर सभागृहात पोहोचले.  

विश्वासदर्शक ठरावावेळी विरोधी पक्षातील आमदार फुटू शकतात अशी चर्चा सुरू होती. विधानसभा अध्यक्ष अवध चौधरी यांना पदावरून हटवण्याचा ठराव सभागृहात मंजूर झाल्याने त्यांना अध्यक्षपदावरून हटवण्यात आले. त्यांच्याविरुद्धचा अविश्वास प्रस्ताव सभागृहात मंजूर झाला. 

Whats_app_banner
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर