Chhattisgarh Naxal Encounter : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात सुरू असलेल्या अभियानात सुरक्षा दलाला (security forces) मोठं यश मिळाले आहे. नारायणपूर आणि कांकेर बॉर्डरवर सुरक्षा दलांच्या जवानांनी १० नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. यामध्ये ३ महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. या चकमकीत १० नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत.
सुरक्षा दलांनी घटनास्थळावरून AK-47 सह मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे व स्फोटके हस्तगत केली आहेत. या चकमकीत गोळी लागल्याने अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान सर्व जवान सुरक्षित आहेत.
मंगळवारी छत्तीसगडमध्ये मोठे एनकाउंटर केले गेले. मिळालेल्या माहितीनुसार नारायणपूर जिल्ह्यातील अबूझमाड येथे जवानांनी नक्षलवाद्यांनी अनेक ठिकाणी घेरले. जिल्हा राखीव दल (डीआरजी) आणि एसटीएफची पथके अबूझमाडच्या जंगलात उपस्थित आहेत. दोन्ही बाजुंनी जोरदार फायरिंग केली गेली. या चकमकीत आतापर्यंत नक्षली कमांडर मल्लेस कुंजाम याच्यासह १० जण ठार झाल्याचे वृत्त आहे.
सुरक्षा दल व नक्षलवाद्यांमध्ये आज सकाळी ६ वाजल्यापासूनएनकाउंटरची सुरुवात झाली. आतापर्यंत १० नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून त्यामध्ये तीन महिला आहेत. मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.
या एनकाउंटरवर आयजी पी. सुंदरराज, एसपी प्रभात कुमार नजर ठेऊन आहेत. बातमी प्रकाशित होईपर्यंत सुरक्षा दल व नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरूच आहे.
नारायणपूरचे एसपी प्रभात कुमार यांनी चकमक झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दरम्यान या चकमकीत नक्षलवाद्यांचे किती नुकसान झाले याची माहिती समोर आलेली नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत १० नक्षलवादी ठार झाले आहेत. त्यांच्याकडून एके ४७ सह मोठा शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला आहे. जूनही जंगलात शोध मोहीम सुरू आहे. काही दिवसांपूर्वी सुरक्षा दलाने कांकेर जिल्ह्यातील छोटे बेठिया येथे २९ नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता.
उन्हाळ्यात नक्षलवादी सुरक्षा दलांना निशाणा बनवून मोठे हल्ले करतात. हे लक्षात घेऊन सुरक्षा दलाने कारवाई सुरू केली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला कांकेर जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत २९ नक्षलवादी ठार झाले होते.
यावर्षी आतापर्यंत नारायणपूर आणि कांकेरसह सात जिल्ह्यांचा समावेश असलेल्या बस्तर प्रदेशात सुरक्षा दलांसोबत झालेल्या वेगवेगळ्या चकमकीत ८८ नक्षलवादी ठार झाले आहेत.
संबंधित बातम्या