मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Bharat Jodo Nyay Yatra: राहुल गांधींची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ नियोजित वेळेच्या ४ दिवस आधीच संपणार, कारण काय?

Bharat Jodo Nyay Yatra: राहुल गांधींची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ नियोजित वेळेच्या ४ दिवस आधीच संपणार, कारण काय?

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 05, 2024 05:40 PM IST

Bharat Jodo Nyay Yatra : आगामी लोकसभानिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्याययात्रानियोजित वेळेच्या ४ दिवस आधीच संपवली जाणार आहे.

राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा मुंबईत संपणार
राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा मुंबईत संपणार

Bharat Jodo Nyay Yatra: काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा नियोजित वेळेच्या चार दिवस आधीच संपणार आहे. १६  मार्च रोजी न्याय यात्रा मुंबईत संपणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी  इंडिया आघाडीची रॅली होणार आहे. यावेळी इंडिया आघाडीकडून शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. १७ मार्च रोजी इंडिया आघाडीची मुंबईत सभा होणार आहे.

लवकर का संपत आहे न्याय यात्रा?
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्याय यात्रा नियोजित वेळेच्या ४ दिवस आधीच संपवली जाणार आहे. निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेस आपली न्याय यात्रा आटोपती घेत आहे. राहुल गांधी न्याय यात्रा संपल्यानंतर जाहगा वाटपाबाबत घटक पक्षांबाबत चर्चा करू शकतात. बंगाल आणि महाराष्ट्रात जागा वाटपाबाबत सहमती बनलेली नाही. 

राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा १४ जानेवारी २०२४ रोजी मणिपूरमधून सुरू झाली. नियोजित वेळापत्रकानुसार यात्रा २० मार्च रोजी संपणार होती, पण आता ही यात्रा ४ दिवस आधीच, १६ मार्च रोजी संपत आहे.  राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो न्याय यात्रेत काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश तसेच पक्षातील अनेक ज्येष्ठ नेते सहभागी झाले आहेत. या यात्रेद्वारे राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

मणिपूरपासून सुरू झालेली भारत जोडो न्याय यात्रा ईशान्येकडील राज्ये नागालँड, अरुणाचल प्रदेश, आसाममार्गे पश्चिम बंगालमध्ये पोहोचली. आसाममध्ये पोलीस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. आसामच्या मुख्यमंत्र्यांनी यात्रेला अडथळा निर्माण केल्याचा आरोप करण्यात आला. बंगालमध्ये ममता बॅनर्जी यात्रेत सामील झाल्या नाहीत. बंगालनंतर यात्रा बिहारमध्येही गेली अन् तेथील महाआघाडीचे सरकार कोसळले. नितीशकुमार पुन्हा जेडीयूसोबत एनडीएमध्ये सामील झाले. त्यानंतर झारखंड आणि ओडिशा आणि छत्तीसगडमध्येही झाला. उत्तर प्रदेशात यात्रा दाखल झाल्यानंतर समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव या यात्रेत सहभागी झाले होते. सध्या भारत जोडो न्याय यात्रा मध्य प्रदेशात सुरू असून आज राहुल गांधी यांनी उज्जैनमधील मंदिरात जाऊन महांकाळचे दर्शन घेतले.

मध्य प्रदेशपाठोपाठ राजस्थानमार्गे ही यात्रा गुजरातमध्ये पोहोचणार आहे. येथून ही यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करेल आणि नंतर मालेगाव, नाशिक, ठाणे मार्गे मुंबई येथे संपेल.

IPL_Entry_Point