Viral News :सोशल मीडियावर दररोज काहीना काही व्हायरल होतं असतं. कधी लोकांचं मनोरंजन करणाऱ्या या गोष्टी असतात तर कधी लोकांना चिंतेत टाकणाऱ्या या व्हायरल गोष्टी असतात. चीनमध्ये देखील असेच एक प्रकरण व्हायरल झालं आहे. प्रेमी आपल्या प्रेयसीला इम्प्रेस करण्यासाठी विविध कल्पना लढवत असतात. मात्र, अशीच एक कल्पना प्रियकरांच्या अंगलट आली.
खरं तर एका चिनी व्यक्तीला आपल्या प्रेयसीला लग्नासाठी प्रपोज करायचं होतं. त्यासाठी त्याने सोन्याची अंगठी विकत घेतली. प्रेयसीला सरप्राईज देण्यासाठी त्याने ती अंगठी केकच्या आत लपवली. व त्यानंतर केक शिजवला. जेव्हा त्याने तो केक आपल्या प्रेयसीसमोर ठेवला तेव्हा त्याच्या प्रेयसीने अंगठीसह केक खाऊन टाकला.
चीनच्या सिचुआन प्रांतातील लियू या महिलेने सोशल मीडियावर तिच्या सोबत घडलेल्या या घटनेची माहिती दिली आहे. तिने पोस्ट केलेल्या मथळ्यामध्ये लिहिलं की, सर्व पुरुषांनी लक्ष द्यावं, कोणत्याही खाद्यपदार्थात अंगठी कधीही लपवू नये, नाहीतर तुमची प्रेयसी ती खाऊन टाकण्याची शक्यता जास्त आहे. लियू या या महिलेचे नाव असून तिने जे काही घडलं ते तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. तिची ही पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल झाली असून नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
लियूने लिहिलं की, एका रात्री तिला खूप भूक लागली होती. त्यामुळे तिच्या बॉयफ्रेंडने बनवलेला केक खाण्याच्या ती विचारात होती. तिने केक खाल्ला. खातांना तिच्या पोटात काही तरी धातूचा तुकडा गेला आहे याची जाणीव तिला झाली. तिला वाटलं केक खराब असेल. या बाबत ती तक्रार करण्यासाठी बेकरीमध्ये देखील जाणार होती. तेवढ्यात तिचा बॉयफ्रेंड तिथे आला आणि तो म्हणाला की हो कदाचित ती अंगठी असेल की जी मी तुला प्रपोज करण्यासाठी केक मध्ये लपवली होती.
लियू यांनी लिहिलं की, सुरुवातीला वाटले की हा कदाचित एक विनोद असेल. पण नंतर जेव्हा मी दवाखान्यात गेले तेव्हा मला यावर विश्वास बसला. दरम्यान, तिने तिच्या प्रियकराचा लग्नाचा प्रस्ताव स्वीकारला की नाही ? असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारल. यावर तिने हो म्हणून उत्तर दिलं. लियू यांनी या घटनेचे वर्णन वर्षातील सर्वात अनोखी व नाट्यमय घटना म्हणून केलं आहे.
ही घटना सोशल मीडियावरही चांगलीच व्हायरल झाली आहे. यानंतर लोकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरनं लिहिलं की, तिच्या दातांमध्ये वाघासारखी शक्ती आहे. दुसऱ्याने लिहिले की, "या जोडप्याला, प्रामुख्याने वधूला वाघा सारख्या शुभेच्छा."
संबंधित बातम्या